सुलवाडे-जामफळ पाइपलाइन जोडणी

सुलवाडे-जामफळ पाइपलाइन जोडणी
Published on: 
NSK26H32019, NSK26H32020 जामफळ धरण ः मुख्य जलवाहिनी जोडणी कामाच्या प्रारंभप्रसंगी बोलताना मंत्री जयकुमार रावल. शेजारी डॉ. सुभाष भामरे, नारायण पाटील आदी. दुसऱ्या छायाचित्रात कार्यक्रमास उपस्थित शेतकरी आदी. --- शिंदखेड्याच्या शिवारात समृद्धीची नवी पहाट उगवणार --- पालकमंत्री जयकुमार रावल; जामफळ पीडीएन योजनेच्या मुख्य जलवाहिनी जोडणी कामाचा प्रारंभ सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ११ ः सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजनेमुळे ५४ गावांच्या शेतीला शाश्वत सिंचनाचा आधार मिळणार आहे. त्यामुळे पिढ्यान्‌पिढ्या दुष्काळाशी संघर्ष करणाऱ्या शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात आता परिवर्तनाची नवी पहाट उगवणार आहे. शिंदखेडा तालुक्याच्या माथ्यावर असलेला दुष्काळाचा शिक्का कायमचा पुसून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणण्याचा आपला संकल्प आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. जामफळ धरण येथे पीडीएन योजनेच्या मुख्य जलवाहिनी जोडणी कामाचा रविवारी (ता. ११) प्रारंभ झाला, त्या वेळी ते बोलत होते. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, दोंडाईचा बाजार समितीचे सभापती नारायण पाटील, पंकज कदम, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, कार्यकारी अभियंता संदीप पवार, स्वप्नील गांगुर्डे, विशाल खैरनार, केतन भोसले, अमरदीप पाटील, अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, की शिंदखेडा तालुक्याच्या एका बाजूला बारमाही वाहणारी तापी नदी असतानाही अवघ्या काही किलोमीटर अंतरावरील गावांना वर्षानुवर्षे दुष्काळाचा सामना करावा लागला. पाऊस झाला तर पीक, अन्यथा नुकसान अशी परिस्थिती बदलण्यासाठी तापी नदीचे पाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला. सुलवाडे- जामफळ प्रकल्पाच्या मंजुरीसाठी २०१४ नंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा केला. तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचेही सहकार्य लाभले. फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर प्रकल्पाच्या कामाला गती मिळाली. लवकरच सिंचनाचा लाभ मुख्य प्रकल्पाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांना लवकर सिंचनाचा लाभ मिळावा, यासाठी मुख्य जलवाहिनी जोडणीचे काम सुरू केले आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रात पाणी वितरणाची व्यवस्था विकसित करण्याचे, तर पुढील टप्प्यात १३ ते १४ हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ देण्याचे नियोजन असल्याचे मंत्री रावल म्हणाले. माजी मंत्री डॉ. भामरे, बाजार समितीचे सभापती पाटील, पंकज कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. --- चौकट ३२५ किलोमीटर जलवाहिनीचे काम पूर्ण जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीसाठी एक हजार ५८ कोटी रुपयांची कामे हाती घेतली. या प्रणालीद्वारे ५४ गावांमधील २६ हजार ९०७ हेक्टर लाभक्षेत्राला पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. एकूण ७६६.१६४ किलोमीटर जलवाहिनीपैकी ५४८.८१ किलोमीटर पाइपचा पुरवठा झाला असून, ३२४.९३ किलोमीटर पाइप अंथरण्याचे काम पूर्ण झाले. प्रकल्पातील पाच रेल्वे आणि तीन राष्ट्रीय महामार्ग क्रॉसिंगपैकी दाबली, मेलाणे व माळीच येथील रेल्वे क्रॉसिंगची कामे पूर्ण झाली असून, होळ येथील काम अंतिम टप्प्यात असल्याचे श्री. रावल यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com