NSK26H33643 ः जामुंडे हिल्स
---------------
जामुंडेतील जलविद्युत प्रकल्पाचा फेरविचार करा
पर्यावरणप्रेमींची शासनाकडे मागणी; झाडे, वन्यजीव, जैवविविधता येणार धोक्यात
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.२७ : भावली धरणालगतच्या जामुंडे पर्वत परिसरात प्रस्तावित १,५०० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पामुळे सह्याद्रीतील वनसंपदा, जैवविविधता आणि वन्यजीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पाचा फेरविचार करून पर्यावरणाची हानी टाळावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र जोशी यांनी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे केली आहे.
‘प्रकल्पासाठी जामुंडे पर्वत परिसरातील सुमारे ६०० एकर वनक्षेत्र वापरले जाण्याची शक्यता असून, यामुळे डोंगररांग, घनदाट जंगल, स्थानिक वनस्पती आणि वन्यजिवांच्या अधिवासावर परिणाम होऊ शकतो’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. इगतपुरी आणि शहापूर तालुक्यांच्या सीमेलगतचा हा परिसर पश्चिम घाटाच्या पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील पट्ट्यात येतो. कळसूबाई पर्वतरांग आणि सह्याद्रीच्या कुशीतील वनसंपदेच्या दृष्टीने या परिसराला विशेष महत्त्व आहे. प्रकल्पासाठी डोंगर उत्खनन, वृक्षतोड आणि अन्य बांधकामे झाल्यास पर्यावरणीय समतोल बिघडण्याची शक्यता असल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे. स्थानिक आदिवासींच्या जमिनी, उपजीविका आणि जनजीवनावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचाही विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे.
विभागीय आयुक्तांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे जोशी यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वन्यजीवांचे संरक्षण, सह्याद्रीची वनसंपदा आणि पर्यावरणीय समतोल जपण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करूनच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.
-----------------
१६-१
जामुंडेतील जलसंपदा
- १५०० मेगा वॉटचा उपसा जलविद्युत प्रकल्प
- हरिश्चंद्र- कळसूबाई अभयारण्यापासून २.१ किमी अंतरावर प्रकल्प
- इगतपुरी तालुक्यातील ६,२३५ झाडे तोडली जाणार
- एकूण ६४०५० झाडे बाधित होणार
- ९ सस्तन प्राणी, ११ प्रकारचे पक्षी, ३ सरपटणारे प्राणी होणार बाधित
---
कोट
विकासाला नागरिकांचा विरोध नाही; मात्र भविष्यात त्याची मोठी किंमत देशाला मोजावी लागू नये. भावली धरण आणि जामुंडे पर्वत परिसरातील प्रस्तावित प्रकल्पामुळे जंगल, प्राणीमात्र, फुलझाडे आणि स्थानिक जनजीवनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने या प्रकल्पाचा फेरविचार करावा, अशी विनंती विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
- सुरेंद्र जोशी, सामाजिक कार्यकर्ते
---------------