जळगाव जेडीसीसी बँकेचा फोटो घेणे.
--
अखेर ‘जेडीसीसी’ची अंतिम मतदार यादी जाहीर
२५७१ मतदार; लवकरच होणार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची निवड
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.१४ : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १४) नाशिक सहनिबंधक संभाजी निकम यांनी बँकेच्या २५७१ मतदारांची यादी जाहीर केली आहे. या याद्या जिल्हा बँकेसह जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुका निबंधक कार्यालय, नाशिक सहनिबंधक कार्यालयातही लावण्यात आल्या आहेत. आता बँकेच्या निवडणुकीची तारीख केव्हा जाहीर होते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
प्राथमिक विविध कार्यकारी संस्था, दूध डेअरी संस्था, मालविक्री प्रक्रिया सहकारी संस्था, अर्बन सहकारी संस्था, गृहनिर्माण सहकारी संस्था, पगारदार सहकारी संस्था आदी संस्थांचे सभासद मतदार या निवडणुकीसाठी असतात.
पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटी व इतर संस्थांकडून एकूण दोन हजार ४५० ठराव जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला मिळाले आहेत. हे ठराव सहनिबंधकांकडे पाठविण्यात आले आहेत.
बँकेची अधिकृत निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने विविध सहकारी सोसायट्यांसह इतर सहकारी सोसायट्यांकडून ठराव मागविले होते. २ सप्टेंबरला ठराव पाठविण्याची अंतिम मुदत होती. त्यामुळे २ सप्टेंबरअखेर विकास व शेती सहकारी संस्थांचे ८७६ आणि इतर सर्व सहकारी संस्था (दुग्ध संस्थासहित) एक हजार ५७४ असे एकूण दोन हजार ४५० ठराव प्राप्त झाले होते.
चौकट
आता निवडणुकीची प्रतीक्षा
प्राप्त झालेले ठराव नाशिक सहनिबंधकाकडे पाठविले होते. तेथे ठरावांची छाननी, अंतिम मतदारयाद्या तयार करून बुधवारी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. लवकरच मतदान अधिकारी, मतदानाची तारीखही ठरविली जाईल. बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर सध्या बँकेच्या २३७ शाखा आणि १२ लाखांहून अधिक ग्राहक आहेत. मागील पंचवार्षिक निवडणूक २१ नोव्हेंबर २०२१ ला झाली होती. यंदा निवडणुकीची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.