जिजाऊनगरात दोन लाखांचे दागिने लंपास
---
जळगाव तालुका पोलिसांत गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १४ : शहरातील जिजाऊनगरातील बंद घरातून चोरट्यांनी एक लाख ९२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. दागिने चोरुन नेणारा कुटुंबीयांच्या परिचयाचा असल्याचे उघड झाले असून, या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रदीप हिंमत राजपूत (वय ४३, रा. गट नं. १६६, प्लॉट नं. २, जिजाऊनगर, सावखेडा शिवार, गिरणा पंपीग रोड, जळगाव) यांच्या घरातून संशयित शुभम हिरालाल परदेशी (रा. तांदळी, ता. अमळनेर, ह.मु. जिजाऊनगर, जळगाव) आला होता. २७ सप्टेंबरला सकाळी अकरापासून ते ३ ऑक्टोबरच्या सायंकाळी सहादरम्यान फिर्यादी घरी नसताना संशयिताने घरातील वरील मजल्यावरील बेडरुममध्ये प्रवेश केला. बेडरुममधील वॉर्डरोब बंद असलेला लाॅकर माहीत असलेल्या ठिकाणातून चावी काढून त्याने लॉकर उघडला. लॉकरमधील लाल रंगाच्या बॉक्समध्ये ठेवलेले १ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे, ७२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. संशय असल्याने प्रदीप राजपूत यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संशयित शुभम हिरालाल परदेशीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक धनराज पाटील तपास करीत आहेत.