टुडे पान ४, मेन फिचर (जिल्हा - शहर कॉमन)
-----------
NSK26H35272
---
सांधेरोपण शस्त्रक्रियेत भारताची ‘नंबर वन’कडे वाटचाल
उपशीर्षक
बदलत्या जीवनशैलीचा शाप; जनजागृतीसह तंत्रज्ञानामुळे वाढला शस्त्रक्रियेकडे कल
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १८ : बदलती जीवनशैली, तासन्तास बैठे काम, जीवनसत्त्व नसलेले अन्न यामुळे हाडांची झीज लवकर होणे, हाडे कमकुवत होण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. जगभरातच ही स्थिती असताना सर्वाधिक लोकसंख्येच्या भारतात गेल्या काही वर्षांत झालेल्या जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे सांधेरोपणाचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढलेय. सद्य:स्थितीत सांधेरोपण शस्त्रक्रियेत अमेरिकेनंतर भारताचा क्रमांक असून २०२७ मध्ये आपण सांधेरोपणात ‘नंबर वन’ असू, असे सांगितले जात आहे.
सांधेरोपण.. इंग्रजीतील जॉइंट रिप्लेसमेंट हा प्रचलित शब्द.. ही एक आधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती आहे. या प्रक्रियेमध्ये गुडघा, खुबा (हिप) किंवा खांदा यांसारख्या सांध्यांची झीज झाल्यास किंवा सांधा गंभीररीत्या खराब झाल्यास त्याच्या नैसर्गिक भागाऐवजी कृत्रिम सांधा बसवला जातो.
प्रामुख्याने ऑस्टिओआर्थरायटिस, वाढते वय, अपघात, सांध्यांना झालेली दुखापत आणि हाडांचे आजार यांमुळे ही शस्त्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमुळे रुग्णाला वेदनांपासून आराम मिळतो, चालणे-फिरणे सोपे होते आणि जीवनमान सुधारण्यास मदत होते.
---
हाडांची झीज प्रमुख कारण
सांधेरोपणाची वेळ प्रामुख्याने हाडांची अतिप्रमाणात झीज झाल्यामुळे होते. अलिकडच्या काळात अन्नधान्यात पूर्वीसारखा कस राहिलेला नाही. बदललेल्या जीवनशैलीने खाण्याच्या सवयी, जेवणातील पदार्थही बदलले. पौष्टिक पदार्थांऐवजी जंकफूडचे प्रमाण वाढले. स्वाभाविकत: शरीरात ‘ड’, ‘क’ जीवनसत्त्वाची कमतरता भासू लागली. त्यामुळे हाडे तारुण्यातच ठिसूळ होण्याचे प्रमाण वाढले.
स्टेरॉईड, व्यसनाधीनताही कारण
हाडांची झीज प्रामुख्याने वृद्धत्वाच होते, असे मानले जायचे. परंतु, तारुण्यातही हा प्रकार व्हायला लागला आहे. शिवाय, तरुणांमधील व्यसनाधीनता, स्टेरॉइडमुळे रक्तात गाठी होतात, त्यामुळे हाडांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही. परिणामी, हाडांची झीज लवकर होते. यात प्रामुख्याने गुडघा आणि खुब्याच्या सांधेरोपणाचे प्रमाण अधिक आहे. खेळाडूंमध्येही मैदानावरील अपघातांमुळे या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात केल्या जातात.
सांधेरोपणाचे प्रमाण वाढले
सांध्यांचे आजार, अपघात आणि उपचारांविषयी वाढलेली जागरूकता ही या वाढीची प्रमुख कारणे आहेत. रोबोटिक तंत्रज्ञान आणि आधुनिक कृत्रिम सांध्यांमुळेही या उपचारांना अधिक स्वीकार्यता मिळत आहे.
----
(चौकट)
नोंदणीकृत शस्त्रक्रियांची स्थिती
भारतात गेल्या काही वर्षांत सांधेरोपण शस्त्रक्रियांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे. इंडियन जॉइंट रजिस्ट्रीच्या आकडेवारीनुसार, २००६ मध्ये सुमारे १,०१९ गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियांची नोंद होती. २०१९ मध्ये हा आकडा सुमारे २७ हजारांवर पोहोचला. म्हणजेच नोंदवलेल्या शस्त्रक्रियांमध्ये मोठी वाढ झाली. २०२० ते २०२६ या काळात भारतात सांधेरोपणाची मागणी जगातील सर्वाधिक वेगाने वाढण्याचा अंदाजही संशोधनात व्यक्त करण्यात आला होता.
-----
कोट..
सांध्यांच्या आजारांचे प्रमाण सुरवातीपासूनच अधिक होते, आजही ते आहे. मात्र, आता निदान योग्य व वेळेत होऊ लागले आहे. अशा प्रकारच्या दुखण्यातील वेदना प्रचंड असतात. योग्य वेळी निदान झाल्याने रुग्णाला आवश्यकतेनुसार सांधेरोपणाचा सल्ला दिला जातो. त्यामागचे गैरसमज दूर केले जातात. शिवाय, तंत्रज्ञानामुळे ही प्रक्रिया सुलभ झाली असून त्याविषयी जनजागृतीही वाढलीय. म्हणून सांधेरोपणाचे प्रमाण वाढले आहे.
- डॉ. मनीष चौधरी
----------