फोटो ः 04390
दोंडाईचा ः बेमुदत संप करताना न्यायालयीन कर्मचारी.
न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा
दोंडाईचात बेमुदत संप
दोंडाईचा, ता. १८ ः उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी मंगळवार (ता. १७) पासून राज्यभरातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात दोंडाईचा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील संपूर्ण कर्मचारीवृंद सहभागी झाले आहेत. समान कामासाठी समान वेतन या तत्त्वानुसार दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनाही उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, अशी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासंदर्भातील प्रस्ताव २३ महिन्यांपासून प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप या प्रस्तावावर अंतिम निर्णय झालेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. दुय्यम न्यायालयीन कर्मचारी न्यायालयीन कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावत असून, त्यांच्यावरही मोठ्या प्रमाणात प्रशासकीय व न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी असते. त्यामुळे समान काम, समान जबाबदारी आणि समान वेतन या न्याय्य तत्त्वानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. शासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन मंत्रालयात प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा आणि कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्यभरातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
सदर मागणी मान्य होईपर्यंत बेमुदत संप सुरू ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.
या वेळी सहाय्यक अधीक्षक श्रीमती बी. एन. बागल, लघुलेखक एच. सी. संन्यासी, वरिष्ठ लिपिक एस. सी. मोरे, कनिष्ठ लिपिक एस. ए. वानखेडकर, डी. वाय. कोळी, श्री. डी. आर. शिंदे व श्री. पी. डी. नागरे, बेलिफ एन. एस. मोरे, वाय. यु. फुले, एन. डी. मोरे व ए. एस. पाटील, एस. बी. भंगी, बी. एस. चौधरी, डी. एस. पगार आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
........