SHC26B13459
शिरपूर : प्रांताधिकारी कार्यालयात निवेदन देताना पदाधिकारी.
---------
ज्ञानेश्वर मोरे हत्येप्रकरणी कठोर कारवाई करा
शिरपूरला राजपूत समाजाचे प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
शिरपूर, ता. ७ : जामनेर तालुक्यातील कुंभारी येथे २६ सप्टेंबरला झालेल्या ज्ञानेश्वर उत्तमसिंग मोरे यांच्या हत्या प्रकरणाची निष्पक्ष व जलद चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी येथील महाराणा प्रताप क्षत्रिय राजपूत समाज संस्था आणि माँ राणी पद्मिनी महिला मंडळाने बुधवारी (ता. ७) प्रशासनाकडे केली.
समाजाच्या प्रतिनिधींनी प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांना निवेदन दिले. कुंभारी येथे किरकोळ वादातून मोरे यांची हत्या झाली. या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा प्रसंग ओढवला असून, समाजातही असंतोष निर्माण झाला आहे. घटनेनंतर मृतदेहाची अवहेलना करण्यात आली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या मोरे यांच्या मुलाला मारहाण झाली. या प्रकरणातील कोणत्याही दोषी व्यक्तीला संरक्षण मिळू नये, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी करून तिची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष संग्रामसिंह राजपूत, उपाध्यक्ष योगेंद्रसिंह सिसोदिया, नरेंद्रसिंह सिसोदिया, शिवसेनेचे राजू टेलर, भरतसिंह राजपूत, निवृत्त पोलिस निरीक्षक महेंद्रसिंह राजपूत, देवेंद्र राजपूत, नितीन राजपूत, महेंद्रसिंह गिरासे, राजेंद्र राजपूत, ॲड. प्रविणसिंह पाटील, नगरसेवक राज सिसोदिया, डॉ. योगेश जाधव, विजय गिरासे, माँ राणी पद्मिनी महिला करणी सेनेच्या जया गिरासे, ममता सिसोदिया, अश्विनी राजपूत, सरिता राजपूत, प्रविणा गिरासे, डॉ. अश्विनी राजपूत, चंद्रमा राजपूत आदींनी दिला आहे.