NSK26H34151
जळगाव : कल्की भगवान मूर्तीची मंत्रोपचारात महाभिषेक करताना.
.......
निष्कलंकी धाममध्ये आज कल्की भगवान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
मंत्रोपचारात महाभिषेक विधी उत्साहात; संत-महंतांच्या उपस्थितीत यज्ञपूर्णाहुती, महाप्रसाद
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३१ : शिव कॉलनी परिसरातील सतपंथ ज्योत मंदिर श्री निष्कलंकी धामच्या १७ व्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री निष्कलंकी नारायण (कल्की भगवान) मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सव धार्मिक वातावरणात सुरू आहे. महोत्सवांतर्गत यज्ञाचार्य डॉ. श्रीकांत रत्नपारखी महाराज यांच्या वेदोक्त मंत्रोपचारात भगवंताच्या मूर्तीचा महाभिषेक आणि धान्याधिवास विधी भक्तिभावाने पार पडला. महामंडलेश्वर स्वामी जनार्दन हरिजी महाराज, संत विजय प्रकाश महाराज यांच्यासह संत-महंतांच्या उपस्थितीत हे धार्मिक विधी शास्त्रोक्त पद्धतीने संपन्न झाले.
महोत्सवाचा मुख्य प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी (ता. १ नोव्हेंबर) आयोजित करण्यात आला आहे. जयपूर येथील मकराना येथून आणलेल्या साडेतीन फूट उंचीच्या कल्की भगवान यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूज्य संतांच्या उपस्थितीत होणार आहे. या सोहळ्यास सतपंथ पीठाचे जगद्गुरू सत्पंथाचार्य श्री ज्ञानेश्वरदेवाचार्य महाराज (अहमदाबाद), संत गोपाल चैतन्य महाराज (वृंदावन), महामंडलेश्वर पवनकुमारदास महाराज, स्वामी उदयगीरी महाराज, स्वामी आत्मारामानंद, महंत दीपकदास महाराज यांच्यासह विविध ठिकाणांहून संत-महंत उपस्थित राहणार आहेत. तसेच यज्ञाचार्य डॉ. श्रीकांत रत्नपारखी आणि आचार्य डॉ. सचिन पाटील यांचीही उपस्थिती लाभणार आहे. या धार्मिक सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री निष्कलंकी धामच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट
अशी आहे कार्यक्रम रूपरेषा
रविवार (ता.१) रोजी सकाळी ८.३० वाजता ध्वजारोहण, तर ९ वाजता श्री निष्कलंकी नारायण मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि यज्ञपूर्णाहुती होईल. सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत धर्मसभा, संतमेलन, विशेष सन्मान, गोदान आणि वास्तुदान संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १ ते ३ या वेळेत महाप्रसाद होणार आहे.