08816, 08817
कळसूबाई शिखर : शिखरस्वामिनी कळसुमातेच्या हिरव्यागार डोंगरावर दर्शनासाठी भाविकांची झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात कळसूबाई देवींची मूर्ती.
कळसूबाईच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांचा ओघ
सकाळ वृत्तसेवा
इगतपुरी, ता.१८ : नाशिक, अहिल्यानगर जिल्हयाच्या सीमेवर असलेल्या शिखरस्वामिनी कळसुदेवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कळसूबाई डोंगरावर नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय.
शिखराच्या पायथ्याशी असलेल्या बारी या छोट्याशा गावातून या डोंगराच्या चढाईस सुरवात होते.समुद्रसपाटी पासून ५ हजार ४०० फूट उंचीवर असलेल्या कळसूबाईच्या दर्शनाची ओढ भाविकांना नवरात्रीत लागलेली असते. डोंगर व कपारीतून ओबड-धोबड रस्त्यावरून पाऊलवाट काढत जीव मुठीत धरत प्रवास करून भाविक आपल्या कळसूबाईचे दर्शन घेत आहेत. मुली आणि महिलांची संख्या लक्षणीय आहे.
------
शिखरस्वामिनी कळसुमातेची अख्यायिका
बारी गावातील शिंदे कुटूंबियांनी इंदोरी गावातील खाडे यांची कन्या कळसू हिला दत्तक म्हणून घेतले होते. मात्र दत्तक जाताना कळसूने एक आट घातली होती की, मी कुठल्याही प्रकारची धुणीभांडी, झाडलोट करणार नाही.आणि कोणाच्याही चपला उचलणार नाही. परंतु, या गोष्टीचा खाडे कुटुंबीयांना विसर पडला आणि एका दिवशी त्यांनी कळसूला पाहुण्याची उष्टी भांडी उचलण्यास सांगितल्याने कळसू क्रोधीत झाली. गावाजवळ असलेल्या सर्वात उंच शिखरावर जावून बसली. कळसूला विनवणी करूनही ती खाली आली नाही.अखेर कळसूने शिखरावर एका शिलेचे रूप धारण केले. त्यानंतर हे स्थान कळसूबाईचे स्थान म्हणून नावाने प्रचलित झाले आहे.