कालिकादेवी यात्रोत्सवाला तोबा गर्दी
सलग सुट्या, सप्तमीमुळे दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१८ : नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिका देवी मंदिरात दर्शनासाठी आज दिवसभर भाविकांची गर्दी होती. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. तर दुपारनंतर कालिका देवी यात्रोत्सवात लक्षणीय गर्दी झाली होती. या गर्दीमध्ये लहान मुलांचे हरविण्याच्या घटना घडल्या. पाकिटमारांनी हाथ की सफाई दाखवीत अनेकांच्या पाकिटांवर व महिला-लहान मुलांच्या दागिन्यांवर डल्ला मारला.
नवरात्रोत्सवामुळे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी मंदिरात नाशिकसह पंचक्रोशीतील भाविक दर्शनासाठी येत असतात. विशेषतः शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी आणि दुर्गाष्टमीला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यावेळीही शनिवारपेक्षा रविवारी (ता. १८) मंदिरात आणि यात्रोत्सवात तोबा गर्दी झाली होती. कालिका देवी दर्शनासाठीची रांग लांबपर्यंत पोहोचली होती. रात्री उशिरापर्यंत मंदिरात दर्शनासाठी गर्दी कायम होती. दरम्यान, गर्दीमध्ये लहान मुले हरविण्याचे प्रकार वाढले होते. पोलिसांकडून वारंवार मुलांना सांभाळण्यासह मौल्यवान वस्तू, पाकिट आणि दागिने जपण्याचे आवाहन केले जात होते. तरीही काही पालकांचे मुले गर्दीमध्ये हरवत होती आणि ते पोलिसांकडे धाव घेत होते. या गर्दीमध्ये अनेकांची पाकिटे आणि पर्स चोरीला गेल्याचे प्रकार घडले.