यात्रोत्सवात दागिन्यांवर डल्ला
मुंबई नाका पोलिसात सहा दिवसांमध्ये १६ तक्रारी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १८ : श्री कालिका देवी यात्रोत्सवात दररोज हजारो भाविकांची गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी हात की सफाई दाखवत गर्दीत लहान मुले व महिलांना टार्गेट करीत त्याचे सोन्याचा ऐवज हातोहात लंपास केला आहे. सहा दिवसांमध्ये तब्बल १६ तक्रारी मुंबई नाका पोलिसात दाखल झाल्या आहेत. यामुळे यात्रोत्सवातील पोलिसांचा बंदोबस्त अन् गस्त कुचकामी ठरत असल्याने महिलांमध्ये नाराजी असून, संशयित चोरट्यांना आळा घालण्याची मागणी भाविक महिलांकडून केली जात आहे.
श्री कालिका देवी मंदिरात रविवार (ता. ११) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला आहे. दररोज हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी येत आहेत. गर्दीमुळे मंदिर परिसरात भाविकांची मोठी वर्दळ असताना सोनसाखळी चोरट्यांनी महिला व लहान मुले टार्गेट केल्याचे दिसून येत आहे. गेल्या रविवारपासून शुक्रवारपर्यंतच्या सहा दिवसांत सुमारे १६ महिलांच्या सोनसाखळ्या चोरीला गेल्या आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच मुंबई नाका पोलिसांनी चौकी उभारली आहे. तसेच, जादा फौजफाटाही तैनात केला आहे. होमगार्डसह पोलिस अधिकारी, अंमलदारांची यात्रेत गस्त घातली जात आहे. असे असले तरी गेल्या सहा दिवसात भाविक महिलांच्या सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. त्यामुळे पोलिसांच्या बंदोबस्तावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतो आहे. यात्रोत्सवात जादा बंदोबस्त वाढविण्यासह चोरट्यांना अटकाव करण्याची मागणीसह मंदिर परिसरात नियमित पेट्रोलिंग आणि चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाईची मागणी महिला भाविकांकडून होत आहे.