Latest Marathi News | Kalikadevi Yatrotsav 2022 : मुंबई नाका, महामार्गावर वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kalika mata

Kalikadevi Yatrotsav 2022 : मुंबई नाका, महामार्गावर वाहतूक कोंडी

नाशिक : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी होत आहे. यामुळे जुन्या आग्रा महामार्गावरील वाहतूक तिडके कॉलनीतून वळविली आहे. मात्र, गर्दीमुळे वळविलेल्या मार्गावरही वाहतुकीची कोंडी होऊन वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे मुंबई नाका सर्कल आणि महामार्गावर लांबच्या लांब वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. (Kalika Devi Jatrotsav 2022 Traffic congestion on Mumbai Naka highway Nashik Latest Marathi News)

हेही वाचा: Navratrotsav 2022 : सातवी माळ; सुटीमुळे 30 हजारांवर भाविक जगदंबाचरणी लीन

कोरोनामुळे दोन वर्षांच्या कालखंडांनंतर नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवीचा यात्रोत्सव होत आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे, तर शनिवारी (ता. १) आणि रविवारी (ता. २) भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. यात्रोत्सव आणि भाविकांच्या गर्दीमुळे महामार्ग ते गडकरी सिग्नल या जुन्या महामार्गावरील वाहतुकीचा मार्ग वाहतूक शाखेने बदलला आहे.

या मार्गाऐवजी तिडके कॉलनीतून महामार्गाकडे जाऊन मुंबई नाक्याकडे जाता येते. वाढती भाविकांच्या गर्दीमुळे रविवारी (ता. २) बदललेल्या मार्गावरही वाहतुकीची कोंडी झाली होती. त्याचा मनस्ताप यात्रोत्सवात येणाऱ्या भाविकांसह वाहनचालकांना सहन करावा लागला. मुंबई नाका सर्कलही वाहतूक कोंडीने जाम झाला होता.

सर्व्हिस रोडने मुंबईकडून द्वारका सर्कलकडे जाणाऱ्या मार्गांवर मुंबई नाका सर्कल येथे रविवारी सायंकाळनंतर वाहनांची गर्दी होऊन कोंडी झाली होती. त्यात तिडके कॉलनीतून येणाऱ्या वाहनांची भर पडत असल्याने वाहतूक अधिकच जाम झाली होती. रविवार असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी व यात्रोत्सवासाठी घराबाहेर पडल्याने गर्दी झाली, तर ठिकठिकाणी दुचाकी पार्किंग करण्यात आल्याने त्याचीही भर वाहतूक कोंडीत पडली.

हेही वाचा: Shardiya Navratri 2022 : कालिकामातेच्या दर्शनास तोबा गर्दी