फोटो : H32936
नवसाला पावणारी कालिका माता
---------------------------
प्राचीन इतिहासाचा वारसा लाभलेल्या नाशिकच्या कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवात हजारो भाविकांची मांदियाळी जमते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी १७५० मध्ये केलेल्या जीर्णोद्धारापासून ते आधुनिक मंदिराच्या उभारणीपर्यंतचा प्रवास लाभलेल्या या श्रद्धास्थानात नवसपूर्तीसाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते.
- प्रशांत भरवीरकर
कालिका माता म्हणजे नवसाला पावणारी देवी अशी आख्यायिका आहे. मंदिराला प्राचीन इतिहास लाभला आहे. १७ व्या शतकात नाशिकचे पोलिस पाटील स्व. चिमणराव रंगोजी पाटील यांच्या शेतात हे मंदिर होते. सन १७५० मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. भाविकांच्या सुविधेसाठी मंदिराशेजारी अहिल्यादेवींनी एक बारव खोदली. मंदिराचा जीर्णोद्धार करताना २० बाय २० फूट आकाराचे पत्र्याचा सभामंडप बांधण्यात आले. तसेच मंदिरासाठी विश्वस्त मंडळ नेमण्यात आले. तत्कालीन पोलिस पाटील स्व. कृष्णराव पाटील यांनी या मंदिरासाठी मोठे योगदान दिले आहे.
१९५० मध्ये या मंदिराच्या व्यवस्थापनासाठी तीन विश्वस्तांचे मंडळ नेमण्यात आले. सातत्याने ३५ वर्षे स्व. गुलाबराव कृष्णराव पाटील मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त होते. या काळात मंदिराचा सर्वांगीण विकास झाला. १९७४ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. आर्किटेक्ट ग. ज. म्हात्रे यांनी सध्याच्या मंदिराचा सुरेख आराखडा तयार केला आणि १९८२ मध्ये मंदिराचे बांधकाम अवघ्या तीन लाख रुपयांत पूर्ण झाले. पूर्वी या मंदिरात फक्त महाकालीची मूर्ती होती. नंतर भाविकांच्या आग्रहास्तव महालक्ष्मी व सरस्वतीची मूर्ती स्थापन करण्यात आली. दरवर्षी नवरात्रीनिमित्त कालिका मातेचा उत्सव भक्तिभावाने व उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी नवरात्रीत पहाटेच्या काकड आरतीपासून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. या कालावधीत दररोज हजारो भाविकांची दर्शनासाठी उपस्थिती होती. भाविकांना दर्शन सुलभ व्हावे, या नियोजनासाठी विश्वस्त मंडळ नऊही दिवस अविरत कार्यरत होते. यात्रोत्सवात मिठाई, खेळणींच्या दुकानांची रेलचेल तसेच, भाविकांसह राजकीय, सामाजिक, प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरही येथे दर्शनासाठी व पूजा-आरतीसाठी आले. विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंदिरालगत भक्तनिवास बांधण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांची योग्य व्यवस्था झाली. याठिकाणी अल्पदरात भोजन व्यवस्था देखील असल्याने नवरात्रकाळात अनेकांनी त्याचा लाभ घेतला. कालिका माता नवसाला पावणारी देवी असल्याची भाविकांची श्रद्धा असल्याने केवळ नाशिक शहरातूनच नाही, जिल्हाभरातून नवस करण्यासाठी व इच्छा पूर्ण झाल्यानंतर तो फेडण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक नवरात्रात येथे आले. तसेच वर्षभरही हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतात.