कालिकामाता यात्रा मार्गावर पोलिसांची पायी गस्त
भाविकांना सावधगिरीच्या सूचना; वाहतूक नियोजनासासाठी स्वतंत्र पथक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ११ : नवरात्रोत्सवानिमित्ताने शहराची कुलदेवता श्री कालिका देवी यात्रोत्सव सुरू आहे. देवीच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येतात. सायंकाळी यात्रेसाठी गर्दीही होते. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आयुक्तालयातर्फे कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात असून, यात्रा मार्गावर पोलिसांकडून पायी गस्त केली जात आहे. तसेच, यात्रेच्याच ठिकाणी उभारण्यात आलेल्या पोलिस नियंत्रण कक्षातून भाविकांना वारंवार सावधगिरीच्या सूचना दिल्या जात आहेत.
कालिका देवी व भगूर येथे रेणुका देवी यात्रोत्सव या दोन्ही ठिकाणी दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. विशेष: सायंकाळी यात्रेसाठी गर्दी होते. या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ एकच्या उपायुक्त मोनिका राऊत, परिमंडळ दोनचे उपायुक्त किशोर काळे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, वाहतूक शाखेतर्फे वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी स्वतंत्र पथकही याठिकाणी तैनात केले आहेत.
दरम्यान, यात्रेच्या गर्दीमध्ये महिला व लहान मुलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार होतात. तसेच, पाकिटमारी, मोबाईल चोरी असेही प्रकार घडतात. गर्दीमध्ये लहान मुले हरविण्याचेही प्रकार होतात. यासाठी मुंबई नाका पोलिसांनी कालिका देवी मंदिरासमोरच छोटेखानी नियंत्रण कक्ष सुरू केला असून, याठिकाणी पोलीस अधिकाऱ्यांसह पथक उपस्थित आहे. येथून ध्वनिक्षेपकाद्वारे भाविकांना सावधगिरीच्या सूचना देतानाच, यात्रा मार्गात अडथळा निर्माण करणार्या फेरीवाले, विक्रेत्यांनाही सूचना केली जाते. तसेच, यात्रा मार्गात पुरुष अंमलदारांसह महिला अंमलदारांचीही सतत पायी गस्त सुरू असणार आहे. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून सूचना केल्या जात आहेत. मध्यरात्रीपर्यंत भाविकांची गर्दी असल्याने पोलिसांकडून सतत करडी नजर ठेवली जाणार आहे.