कळसूबाई शिखरावर रोपवेसाठी हालचाली

पर्यटन विभागाच्या बैठकीत प्राथमिक सर्वेक्षणाचा निर्णय; आमदार डॉ. लहामटेंचा पाठपुरावा
Kalsubai Shikhar
Kalsubai Shikharsakal

इगतपुरी : इगतपुरी तालुक्याच्या हद्दीवरील कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून वर्षभर तेथे हजारो पर्यटक भेटी देत असतात. अतिशय खडतर मार्ग असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी तात्पुरता मार्ग असून तो धोकादायक असल्यामुळे आता तेथे रोपवे असावा यासाठी पर्यचन महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत प्राथमिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील हजारो हौशी पर्यटकांची सोय होणार आहे. यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. आता हा प्रश्‍न पाठपुरावा करीत मार्गी लागावा अशी अपेक्षा पर्यटकांनी व्यक्त केली आहे.

इगतपुरी तालुक्यासह कळसूबाई परिसरातील अनेक लोकांना पर्यटनामुळे रोजगार मिळतो. शिखरावर जाण्यासाठी रोपवे व्हावा यासाठी अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचाही पाठपुरावा सुरु होता. याबाबत राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या बैठकीत आमदार डॉ. लहामटे, पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, पर्यटन सहसंचालक धनंजय सावळकर हे सहभागी झाले होते. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सर्वसामान्य पर्यटकांना कळसूबाई शिखरावर सुलभपणे जाण्यासाठी रोपवे निर्मितीसाठी प्राथमिक स्वरूपात सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

याचा द्यावा अहवाल

सध्याची पर्यटक संख्या आणि नव्या सुविधेमुळे वाढणारे संभाव्य पर्यटक यांच्यासह स्थानिकांना होणारा लाभ यावर सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत.

नाशिक आणि नगर जिल्ह्याच्या हद्दीवर कळसूबाई हे राज्यातील सर्वात उंच शिखर आहे. राज्यासह देशभरातील गिर्यारोहक आणि निसर्गसौंदर्य अनुभवणाऱ्या पर्यटकांचा येथे राबता असतो. इगतपुरी तालुक्यातून या शिखरावर जाण्यासाठी काही मार्ग असले तरी बारी गावातील जहागीरदारवाडी भागातून मुख्य मार्ग आहे. कळसूबाईच्या दर्शनासाठी आबालवृद्ध नेहमीच येथे जातात. या परिसरात पर्यटकांच्या आवडीची अनेक महत्वाची ठिकाणे आहेत. त्यामुळे कळसूबाई परिसर पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे शिखरावर जाण्यासाठी रोपवे सुविधा तयार करण्यासाठी आमदार डॉ. लहामटे यांचा नेहमी प्रयत्न राहिला आहे.

''सह्याद्री पर्वत रांगेतील एक हजार ६४६ मीटर उंचीचे कळसूबाई शिखर आमच्या अनेक गिर्यारोहकांचे सर्वोत्तम ठिकाण आहे. शिखर स्वामीनी कळसूबाई देवी जागरूक स्थान असल्याने येथे नियमित वर्दळ असते. पर्यटकांना रोपवे सुविधा निर्माण झाल्यास या भागातील स्थानिकांना रोजगार तर मिळेलच पण पर्यटनाच्या दृष्टीने विविध सोयी सुविधांमध्ये भर पडेल. रोपवे निर्मित केला तरी शिखरावर जाण्याचा सध्याचा मार्ग बंद न करता दोन्हीही पर्याय सुरू असावे.आमचा यासाठी नेहमीच पाठिंबा राहिल.''

- भगीरथ मराडे, अध्यक्ष कळसूबाई मित्रमंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com