दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत राहा; आमदार नितीन पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश/कळवण सुरगाणा तालुका दुष्काळी उपाययोजना आढावा बैठक संपन्न

दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत राहा; आमदार नितीन पवार यांचे अधिकाऱ्यांना निर्देश/कळवण सुरगाणा तालुका दुष्काळी उपाययोजना आढावा बैठक संपन्न
Published on: 
फोटो : 09631 कळवण ः कळवण-सुरगाणा दुष्काळी आढावा बैठकीत बोलताना आमदार नितीन पवार. शेजारी सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारूळे आदी. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत राहा आमदार नितीन पवार ः कळवण-सुरगाणा तालुका दुष्काळी आढावा बैठक कळवण, ता. २ : यंदा पावसाने मोठा खंड दिल्याने कळवण व सुरगाणा तालुक्यांतील खरिपाची स्थिती बिकट असून, त्याचा फटका पिकांच्या वाढीवर झाला आहे. दोन्ही तालुक्यांचा ‘ट्रिगर-१’मध्ये समावेश झाला असून, दोन्ही तालुके दुष्काळ जाहीर झाले आहेत. या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी, ग्रामविकास, जलसंपदा व महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात दक्ष राहून दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांसोबत राहावे, असे निर्देश आमदार नितीन पवार यांनी दिले. कळवण-सुरगाणा तालुक्याच्या दुष्काळ उपाययोजनांसंदर्भातील संयुक्त आढावा बैठक कळवण येथील प्रकल्प कार्यालयात झाली. त्या वेळी आमदार नितीन पवार अध्यक्षस्तानाहून बोलत होत. सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारूळे, गटविकास अधिकारी रमेश वाघ, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डंबाळे, तालुका कृषी अधिकारी वाल्मीक प्रकाश, महावितरणचे योगेश जगदाळे, पोलिस निरीक्षक प्रदीप देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार मिळणाऱ्या सवलती व मदतीसाठी आवश्यक कार्यवाही करावी, कृषी विभागाने दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशा सूचना आमदार पवार यांनी देत कळवण व सुरगाणा तालुक्यांचा विभागनिहाय आढावा घेऊन दुष्काळासंदर्भात उपाययोजनांचे नियोजन जाणून घेतले. कळवण तालुक्यात ४२ हजार ४१६ हेक्टर, तर सुरगाणा तालुक्यात ३० हजार १०८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. २१ ते ४० दिवसांचा पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे. दोन्ही तालुक्यांत बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भात या पिकांच्या उत्पन्नात घट होईल, असा अंदाज आहे. तलाठी व ग्रामसेवकांनी गावातच थांबून आठ दिवसांत गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन अहवाल सादर करावा. कर्मचारी काम करत नसेल, तर वरिष्ठ कार्यालयाला कळवावे, असेही त्यांनी सांगितले. कळवण तालुक्यात एक लाख १२ हजार ९३२, तर सुरगाणा तालुक्यात ५९ हजार ७६५ जनावरे आहेत. चारा पिकांची परिस्थितीही चिंताजनक असून, दोन्ही तालुक्यांत चारा टंचाई उद्भवू नये, याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. कळवण-सुरगाणा तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्पातून रात्री-बेरात्री बेकायदा पाणीउपसा होत असल्याच्या तक्रारी असून, अशा बेकायदा मोटारी तत्काळ काढून टाकाव्यात. धोंडांबे लघुपाटबंधारे प्रकल्पातून होणारा व्यावसायिक पाणीउपसा बंद करण्याची मागणीही या वेळी करण्यात आली. दुष्काळस्थितीत पाणीटंचाई टाळण्यासाठी महावितरणने अनधिकृत वीजजोडण्या काढण्याची सूचनाही त्यांनी केली. भविष्यात पावसाचे चित्र बिकट असून पाणी अडवण्यासाठी लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांसाठी अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, मनरेगा अंतर्गत जलसंधारण, शिवरस्ते, स्मशानभूमी रस्ते, गाळ काढणे आदी कामांना प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. सुरगाणा तालुक्यात येत्या डिसेंबर-जानेवारीत ४६ गावे व २९ वाड्यांना पाणीटंचाई जाणवणार असून, त्यासाठी टँकर उपलब्ध ठेवण्याचे नियोजन करण्याचे निर्देशही देण्यात आले. या वेळी दोन्ही तालुक्यांतील विभागप्रमुख, कर्मचारी उपस्थित होते. .............. चौकट... फार्मर आयडी प्राधान्याने करावेत कळवण तालुक्यात २८ हजार ६४५, तर सुरगाणा तालुक्यात २२ हजार ९७० शेतकऱ्यांचे फार्मर आयडी झालेले आहे. मात्र १० ते १५ टक्के काम अजूनही शिल्लक आहे. वनपट्टेधारकांचे फार्मर आयडी प्राधान्याने करावेत. सुरगाणा तालुक्यात १२ हजार, तर कळवण तालुक्यात तीन हजार ४०० वनपट्टेधारक असून, त्यांचेही पंचनामे तातडीने करावेत, अशा सूचना आमदार पवार यांनी दिल्या. .......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com