NSK26H31860
कानळदा (ता.जळगाव) : रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देताना सरपंच पुंडलिक सपकाळे. शेजारी भीकन सपकाळे आदी.
-------------
रंगांद्वारे दिला सामाजिक संदेश
-----
कानळदा येथील रांगोळी स्पर्धेत भावना सपकाळे प्रथम
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.११ : सेवा संकल्प अभियान २०२६अंतर्गत १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील कानळदा येथील अंगणवाडीत प्रवेशित बालकांच्या मातांसाठी विशेष रांगोळी स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. गावचे माजी सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत गावातील प्रशिक्षित महिलांपासून ते शेतकरी व शेतमजूर महिला, गृहिणींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. महिलांनी अल्पवेळेत कलात्मकतेचा सुरेख समन्वय साधत आकर्षक रांगोळ्या साकारल्या. कानळदा ग्रामस्थ, सहभागी महिला, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यामुळे सेवा सप्ताहातील हा उपक्रम महिलांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासोबतच सामाजिक संदेश पोहोचविणारा ठरला. या स्पर्धेत भावना सपकाळे प्रथम, कल्याणी योगेश येवले व विद्या शुभम सपकाळे यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सहभागी सर्व स्पर्धकांना पुंडलिक सपकाळे यांनी वैयक्तिक बक्षिसे देऊन स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला. भीकन सपकाळे, मयूर भदाणे, दिनेश सपकाळे, प्रल्हाद न्हावकर, जितेंद्र सपकाळे, अंगणवाडीसेविका, मदतनीस, महिला उपस्थित होत्या. सूत्रसंचालन भारती शिंपी यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश सपकाळे यांनी आभार मानले.