सिंहस्थात ‘कपालेश्वर’च्या समावेशाची शक्यता
दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मंदिर परिसरात विकासकामे
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री कपालेश्वर महादेव मंदिराचा समावेश दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील विकासकामांमध्ये करण्याचे सुतोवाच कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतेच केले. त्यामुळे सिंहस्थाच्या पहिल्या टप्प्यातील कामांपलीकडे मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समावेशामुळे मंदिरातील पायाभूत सुविधा, भाविकांची ये-जा, गर्दीचे नियोजन आणि गोदाघाटाशी असलेली जोडणी यांसारख्या विषयांवर व्यापक नियोजन होऊ शकते.
कपालेश्वर महादेव मंदिर हे नाशिकच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेतील महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. विशेषतः सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात रामकुंड परिसरात स्नानासाठी येणारे भाविक कपालेश्वराचे दर्शन घेतात. त्यामुळे पर्वणीच्या दिवशी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर मंदिराकडे जाणारे मार्ग, पादचारी वाहतूक, दर्शनासाठीच्या रांगा आणि आपत्कालीन व्यवस्थापन यांचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्यास या कामांसाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याची किंवा प्रस्तावित कामांचा विस्तार करण्याची संधी मिळू शकते. मंदिर परिसरातील स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, पिण्याचे पाणी, सार्वजनिक सुविधा तसेच गर्दीच्या वेळी वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. मात्र, नेमकी कोणती कामे हाती घेतली जाणार, त्यासाठी किती निधी मंजूर होणार आणि कामांची अंमलबजावणी कोणत्या यंत्रणेमार्फत होणार, हे अधिकृत आराखडा आणि प्रशासकीय मंजुरीनंतर स्पष्ट होणार आहे.
--चौकट
प्राधान्याकडे लक्ष
कपालेश्वरचा सिंहस्थ विकासकामांमध्ये समावेश झाल्यास केवळ मंदिरापुरता विकास मर्यादित न राहता रामतीर्थ, गोदाघाट आणि आसपासच्या धार्मिक स्थळांकडे जाणाऱ्या भाविकांच्या संपूर्ण अनुभवात सुधारणा करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आयुक्तांच्या सूतोवाचानंतर आता प्रत्यक्ष आराखड्यात कपालेश्वरसाठी कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाते, याकडे लक्ष लागले आहे.