पान चार
------------------
करंजवण धरण परिसरातून स्टार्टर जप्त
अनधिकृत पाणी उपशाविरोधात संयुक्त मोहीम तीव्र
सकाळ वृत्तसेवा
दिंडोरी, ता. १८ : तालुक्यातील करंजवण धरण जलाशयातून होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर पाणी उपशाला चाप लावण्यासाठी जलसंपदा विभाग आणि महावितरण विभागाच्या वतीने बुधवारी (ता. १८) संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेदरम्यान संयुक्त पथकाने धरणाच्या पाणलोट क्षेत्राची पाहणी करून जलाशयाकाठचे विनापरवाना आणि कसलाही मालक किंवा नाव नसलेले वीज स्टार्टर जप्त करण्याची धडक कारवाई केली. प्रशासनाच्या यापूर्वीच्या वारंवार आवाहनानंतरही ज्या स्टार्टर पेटीवर नाव व मोबाईल नंबर लिहिलेला नव्हता, अशा आणि पूर्णपणे अनधिकृत आढळलेल्या साहित्यावर पथकाने जप्तीची कारवाई केली आहे.
ही कारवाई पालखेड पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत, उपविभागीय अभियंता नीलेश वन्नेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये करंजवण धरण शाखा अभियंता आकाश ठाकरे, महावितरणचे सहायक अभियंता मेघराज बागुल, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक धनंजय वीरकर आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सहभाग घेतला.
ज्या शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरलेली आहे, अशांनी आपल्या शेतातील स्टार्टरच्या पेटीवर किंवा बॉक्सवर मार्कर किंवा ऑइल पेंटने आपले पूर्ण नाव आणि चालू मोबाईल नंबर स्पष्ट दिसेल असा अनिवार्यपणे लिहावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.