33081
वडाळी : ‘करपाल्लवी’ सांकेतिक भाषा कलेला उदरनिर्वाहाचे साधन मानून गावोगावी भटकंती करणारे गोंधळी.
‘करपाल्लवी’ सांकेतिक भाषा जतन करण्याची गरज
गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या कुटुंबांचे वंशजाची गावोगावी भटंकती
सकाळ वृत्तसेवा
वडाळी, ता. २२ : छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या काळात बोटांच्या इशाऱ्यावर व्यक्त होणाऱ्या विशिष्ट सांकेतिक भाषेला अनन्यसाधारण महत्व होते. शत्रुच्या गोटातून गोपनीय माहीती मिळविण्यासाठी या सांकेतिक भाषेचा उपयोग व्हायचा. या भाषेवर प्रभुत्व असलेले गुप्तहेर शत्रूची दाणादाण उडवून द्यायचे. या सांकेतिक भाषेची जाण असणाऱ्या गुप्तहेरांना त्याकाळात सर्वाधिक मोबदला मिळत असे. त्या काळात गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या कुटुंबांचे वंशज आजही ‘करपाल्लवी’ भाषेचे जतन करताना दिसतात. या कलेला उदरनिर्वाहाचे साधन मानून गावोगावी भटंकती करीत आहेत. गुप्तहेरांची भाषा मानली जाणारी ''करपाल्लवी'' आता केवळ करमणूकीचे साधन बनली आहे.
बारा बलुतेदारांसह सर्वच घटकांना एकत्र करुन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. यात वेगवेगळ्या कला क्षेत्रांत निपूण असलेल्या सैनिकांना विविध जबाबदारी सोपविण्यात आली. त्यात शत्रुच्या हालचाली, घडणाऱ्या घडामोडी याची खडानखडा माहीती मिळावी म्हणून गुप्तहेरांची नेमणूक केली होती. शत्रुवर हल्ला करणे, किल्ला परिसराची माहीती घेणे, पाळत ठेवणे, हालचालीवर नजर ठेवणे, शत्रुकडे असलेला शस्त्रसाठा, सैन्यबल अशा सुक्ष्म गोष्टीची इंतभूत माहिती गुप्तहेर चोखपणे बजावत होते. त्यासाठी त्यांनी ''करपाल्लवी '' ही स्वतंत्र सांकेतिक भाषा तयार करण्यात आली होती. ही सांकेतिक भाषा शत्रू किंवा इतरांना कुठल्याच बाजुने समजत नसे. मात्र छत्रपती शिवाजी महाराज व गुप्तहेर यांच्यात या भाषेतून संवाद व्हायचा. आता ही सांकेतिक भाषा शेवटची घटका मोजत असून केवळ करमणुकीचे साधन म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.
सांकेतिक भाषेची ‘करपाल्लवी’ कला आत्मसात करणारे गुप्तहेरांचे वंशज आज सर्वत्र विखुरलेले आहेत. गावोगावी गोंधळाचे कार्यक्रम करून हातांच्या बोटाच्या इशाऱ्यातून व्यक्त होणाऱ्या सांकेतिक भाषेतून लोकांचे मनोरंजन करीत आहेत. या कलेवरच दैनंदिन प्रपंच चालवित आहेत. मात्र शासन दरबारी हा घटक उपेक्षित असल्यांची भावना शेगाव (जिल्हा बुलडाणा) येथील राम सगर, सहकारी विजय चव्हाण, रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केली
स्वराज्यांत ''करपाल्लवी'' या सांकेतिक भाषेला विशेष महत्व होते. गुप्तहेर या भाषेचा वापर सर्वाधिक करून अनेक लढाया, युद्ध या काळात सखोल माहितीचे संकलन करायचे. त्यांचा उपयोग युद्धप्रसंगी किंवा जोखमीच्या ठिकाणी केला जायचा. आता मात्र ही भाषा करमणूकीचे साधन झाले आहे. या कलेची शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नाही.
- राम सगर, ''करपाल्लवी'' गोधळी शेगाव, बुलडाणा