NSK26H33882
जळगाव : शाळा तपासणीदरम्यान माहिती घेताना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर.
–
कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष कामांची पडताळणी
(उपशीर्षक)
सीईओ नायर यांची पाच गावांना अचानक भेट; विकासकामांचा आढावा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ३०: ग्रामपंचायतींना थेट १५ वित्त आयोगाचा निधी मिळत असून यातून विकासकामे केली जातात. त्यानुसार वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांची कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यांची पडताळणी केली. तसेच जनसुविधा व मूलभूत सुविधा योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक, गोरगावले बुद्रुक, लासूर, गणपूर आणि अकुलखेडा या गावांना अचानक भेटी देऊन ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाची तपासणी केली. तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतींच्या अभिलेखांची तपासणी केली.
घरकुल योजना आढावा
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक व टप्पा दोन तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि मोदी आवास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.
जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी, तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्ही. जी. रामजी योजनेंतर्गत आवश्यक कामे शेल्फवर घेऊन सुरू करण्याबाबत यंत्रणेला सीईओ नायर यांनी सूचना दिल्या.
आरोग्य उपकेंद्रांना भेटी
दौऱ्यादरम्यान श्रीमती नायर यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन शाळांमधील स्वच्छतागृहांची स्थिती आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली. तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. गोरगावले बुद्रुक आणि लासूर येथील आरोग्य उपकेंद्रांची तपासणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेतला.
इन्फोे
२०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट
पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देणे; या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान २०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना दिल्या. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवून गावपातळीवर पाण्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.
–