पान २ सेकंड मेन
‘कास्ट्राईब’च्या राज्य अधिवेशन २२ ठराव मंजूर
गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गुणवंत कर्मचारी व निवृत्त सभासदांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळा प्रवेश दिनाचे औचित्य साधून कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघ आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी (ता. ७) जळगावात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या अधिवेशनात कर्मचारी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून जवळपास २२ ठराव मंजूर करण्यात आले. यावेळी गुणवंत कर्मचारी, पदोन्नती झालेल्या पदाधिकारी तसेच निवृत्त सभासदांचा सन्मान करण्यात आला.
अधिवेशनाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना मंत्री पाटील म्हणाले, डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळे देशात समता आणि बंधुता टिकून आहे. ही समता चिरकाल अबाधित राहावी, हीच अपेक्षा आहे. अधिवेशनात मांडण्यात आलेल्या २२ ठरावांचा मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. शासनाच्या स्तरावर संघटनेच्या प्रश्नांसाठी तसेच मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातील आवश्यक बाबींमध्ये सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ. नामदेवराव कांबळे यांच्या दीर्घकालीन योगदानाचे कौतुक करतानाच शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे यांच्याशी नव्याने मैत्रीचे नाते निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. अधिवेशनाच्या यशस्वी आयोजनाबद्दल अनिल सुरडकर आणि बापू साळुंखे यांचेही त्यांनी अभिनंदन केले.
अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शासकीय कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. नामदेवराव कांबळे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी संघटना ही कोण्या एका व्यक्तीची नसून सामूहिक प्रयत्नांतून उभी राहणारी शक्ती असल्याचे सांगितले. प्रत्येक सभासदाने संघटनेच्या वाढीसाठी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
मान्यवरांची उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे उपस्थित होते. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. अधिवेशनाचे प्रास्ताविक कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष अनिल सुरडकर यांनी केले.
व्यासपीठावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य मुख्य संघटक प्रभाकर पारवे, कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य सरचिटणीस बाजीराव प्रज्ञावंत, महासंघाचे महासचिव दिलीप पवार, कार्याध्यक्ष सुशील कांबळे, राज्य कोषाध्यक्ष प्रदीप वाघोदे, शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष किरण मानकर आदी उपस्थित होते.
अधिवेशनाच्या यशस्वितेसाठी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण बागुल, माध्यमिक शिक्षक संघटनेचे संजय निकम, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सरचिटणीस विनोद सपकाळे, शिक्षक संघटनेचे जिल्हा सचिव राजीव वानखेडे, जळगाव तालुकाध्यक्ष नितीन सोनवणे यांच्यासह राहुल मोरे, रमेश सोनवणे, किशोर साळुंखे, गोपीचंद भालेराव, चंद्रकांत भालेराव, राजेंद्र चिते, सुनील महाजन, खुशाल सरदार, नवल चव्हाण, अविनाश बागुल, चंद्रकांत सुरवाडे, किशोर म्हस्के आदींनी परिश्रम घेतले. प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू साळुंखे सूत्रसंचालन यांनी केले. संजय निकम यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने अधिवेशनाची सांगता झाली.
चौकट
गुणवंत कर्मचाऱ्यांचा गौरव
अधिवेशनात विविध तालुकाध्यक्षांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रे प्रदान करण्यात आली. अधिवेशनाच्या निमित्ताने गुणवंत कर्मचारी, पदोन्नती प्राप्त पदाधिकारी आणि निवृत्त सभासदांचा गौरव करण्यात आल्याने सभासदांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
चौकट
‘संघटनांच्या प्रश्नांवर नियमित बैठका घ्या’
शासनाच्या परिपत्रकानुसार संघटनांच्या प्रश्नांवर दर तीन महिन्यांनी बैठका घेण्याची तरतूद आहे. त्याचा आधार घेऊन पदाधिकाऱ्यांनी नियमित बैठका आयोजित कराव्यात आणि सभासदांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संघटना नोंदणीकृत असून नियमांनुसार कामकाज करीत असल्याचे त्यांनी सांगितले.