33043
प्रकाशा : तापी, गोमती, पुलिंदा या पवित्र जलाने कावड भरताना वारकरी.
असलोद - सप्तशृंगीगड पदयात्रेचे प्रस्थान
‘अंबे माता कि जय, दुर्गा माता कि जय’ चा जयघोष
सकाळ वृत्तसेवा
वडाळी ता. २२ : असलोद ते सप्तशृंगीगड कावड दिंडी पदयात्रेचे प्रस्थान झाले असून प्रकाशा (ता. शहादा ) येथील तापी, गोमती, पुलिंदा त्रिवेणी संगमावरुन जलाभिषेक केल्यानंतर संगमाच्या पवित्र पाण्याने कावड भरून ‘अंबे माता कि जय, दुर्गा माता कि जय’ चा जयघोषण करीत कावडधारकांची पदयात्रा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. यावेळी जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
कावड दिंडी पदयात्रेची सुरुवात १९६७ ला नवरात्रच्या पावन काळात ब्रम्हलीन मधुसुधन पाठक उर्फ नाना बाबा यांनी सात वारकऱ्यांना घेऊन सुरु केली. वारीतील अखंड नामघोष, शिस्तीचे पालन, अध्यात्मिक परिवर्तन, नाथ पंथाचे आचरण, सेवाभाववृती अशा मौलिक गुणांमुळे गेल्या साठ वर्षात यात १० ते १५ हजार वारकरी सहभागी झाले. कावड पदयात्रेचे हे साठावे वर्षे आहे. खानदेशांतील सर्वात जुनी व भव्य कावड यात्रा म्हणून नाव लौकिक होत आहे.
भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडविणाऱ्या या पदयात्रेत गुजरात, मध्यप्रदेश यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचे भाविकही सहभागी होतात. हजारोच्या संख्येने संचलन करत वारकरी कोजागिरी पौर्णिमेला सप्तशृंगी गडावर देवीचा जलाभिषेक करतात. नवस फेडतात. सध्या या वारीचे नेतृत्व नाना बाबा यांचे वारसदार भटु पाठक करित आहेत. त्याच्यासोबत, धर्मा शिंदे, दिलीप राजभोज, उद्धव पाटील, कैलास पाटील यांचे सहयोग लाभत आहे. यातील कवी धर्मा शिंदे हे दरवर्षो देवी महात्म्यावर स्वयंरचित काव्य रचतात. तेच काव्य प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी गायन केले जाते. तसेच भजन, भारुडच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले जाते. पदयात्रेचा मार्ग प्रकाशा, शहादा, असलोद, चिरखान, सारंगखेडा, दोडाईचा, इंदवे, दुसाणे, साक्री, दिघावे, ताहराबाद, विरगांव, बेज, आठंबे, नांदुरी, सप्तशृंगीगड असा असतो. सध्या ही कावडधारी पदयात्रा नाशिक जिल्ह्यात सीमेवर पोहचली आहे.