कळवणला १६ पासून
दहा टक्के पाणीकपात
कळवण, ता. ८ : आगामी काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये आणि उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करता यावे, यासाठी कळवण नगरपंचायतीने येत्या शुक्रवार (ता. १६)पासून शहराच्या पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यमानात घट झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहराला ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवून पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जलसंपदा विभाग तसेच मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुधारित व निश्चित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची स्थिती पाहून पुढील टप्प्यात कपातीचे प्रमाण वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मुख्य जलवाहिनी, वितरण नलिका, व्हॉल्व्ह आणि जलशुद्धीकरण केंद्रातील पाणीगळती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
पिण्याच्या पाण्याने चारचाकी, दुचाकी धुणे, अंगणात पाणी शिंपडणे किंवा बांधकामासाठी पाणी वापरणे हा अपव्यय मानला जाणार असून, संबंधितांवर दंडात्मक व कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
कोट..
उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून नागरिकांना पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे. नागरिकांनी नळांना तोट्या बसवाव्यात, गळती तातडीने दुरुस्त करावी आणि पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. पाणी बचतीसाठी प्रत्येक कुटुंबाचे सहकार्य आवश्यक आहे.
- ज्ञागेश येवले, मुख्याधिकारी, कळवण