खामखेड्यातील आठ जणांवर दंगलीचा गुन्हा
शिरपूर : रागाने पाहत असल्याच्या कारणावरून युवकाला घराबाहेर बोलावून मारहाण केल्याच्या संशयावरून खामखेडा (ता. शिरपूर) येथील आठ जणांविरोधात शहर पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. १४) रात्री साडेआठला खामखेडा गावात घडली. संगीताबाई चित्ते (वय ४०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा बाळा तथा कृष्णा हा रागाने पाहत असल्याच्या कारणावरून संशयितांनी त्याला बाहेर बोलावून घेतले. त्यानंतर त्याला मारहाण व शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. संशयित भूषण कोळी, संजय कोळी, रत्नदीप कोळी, नितीन कोळी, अमोल चव्हाण, तुषार कोळी, नथ्थू कोळी, प्रमोद कोळी (सर्व रा. खामखेडा) यांच्याविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, हवालदार पवन ईशी तपास करीत आहेत.
---
हाडाखेडजवळ अपघातात एक ठार
शिरपूर : मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने दिलेल्या धडकेने पादचारी ठार झाला. हा अपघात १५ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसहाला महामार्गावर हाडाखेड (ता. शिरपूर) येथील सीमा तपासणी नाक्याजवळ घडला. राजेंद्र शांतिलाल पाटील (वय ५२, रा. लौकी, ता. शिरपूर) असे मृताचे नाव आहे. ते पायी जात असताना, संशयित मालवाहतूक वाहनाने (एमएच १८, बीझेड ०५३७) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात ते ठार झाले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, हवालदार अनिल शिरसाट तपास करीत आहेत.
अर्थेजवळ अपघातात
एक ठार, एक गंभीर
शिरपूर : शिरपूर-शहादा रस्त्यावर अर्थे (ता. शिरपूर) गावाजवळ दुचाकींच्या अपघातात एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (ता. १६) दुपारी दीडला बिजासनी पेट्रोलपंपासमोर झाला. मनोज सोनू पाटील (वय ४५, रा. बलकुवे, ता. शिरपूर) असे मृताचे नाव आहे. तो दुचाकीवरून जात असताना, विजय भिका बडगुजर (वय ३०, रा. अर्थे) याच्या दुचाकीने त्याला धडक दिली. या अपघातात मनोज पाटील ठार झाले, तर बडगुजर याच्या मागे बसलेला अनिल रामचंद्र भिल गंभीर जखमी झाला. याबाबत भूषण पाटील याने दिलेल्या फिर्यादीवरून विजय बडगुजर याच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, हवालदार प्रेमसिंह गिरासे तपास करीत आहेत.