खाद्य पर्यटन
-------------
१६ वा लेख
----
NSK26H33705
जळगाव : केळीच्या पानावरील भरीत पार्टीतील मेनू. (संग्रहित छायाचित्र)
----
NSK26H33706
भरिताची वांगी.
-------
NSK26H33707 (सचिन जोशी)
---------
भरीत पार्टी : खानदेशातील आपुलकीचे प्रतीक
-------------------------------------
‘वांग्यानं भरीत अन् कयण्यानी भाकर..’ खानदेशात या मोसमात आल्यानंतर अशा प्रकारचे वाक्य कानावर पडले नाही तरच नवल. खानदेशच्या; विशेषत: जळगाव जिल्ह्याच्या एकूणच सांस्कृतिक, सामाजिक रचनेत वांग्याच्या भरिताला विशेष महत्त्व आहे. ऑक्टोबर ते फेब्रुवारी या चार- पाच महिन्यांत जळगाव जिल्ह्यातच नव्हे; तर अख्ख्या खानदेशात भरिताच्या पार्ट्या रंगतात.. ही केवळ खाद्यपदार्थांची मेजवानी नसून खानदेशच्या सांस्कृतिक वैभवाचे, सामूहिक आनंदाचे आणि आपुलकीच्या नात्यांचे जिवंत प्रतीक आहे.
- सचिन जोशी, जळगाव
अतिथींच्या स्वागतासाठी खानदेश संपूर्ण महाराष्ट्रात लौकिकप्राप्त आहे.. खानदेश, त्यातही जळगाव जिल्हा म्हटले की डोळ्यांसमोर उभे राहते ते तापीच्या खोऱ्यातील समृद्ध जीवन, अहिराणी भाषेचा गोडवा, रांगडी माणसे, समृद्ध लोकपरंपरा आणि जिभेवर रेंगाळणारी अस्सल खानदेशी चव! या सगळ्या वैशिष्ट्यांमध्ये खानदेशातील ‘भरीत पार्टी’ला एक वेगळेच स्थान आहे.
चुलीवरील भरीत अन् मनामनांतला जिव्हाळा
खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदुरबार या परिसरात, विशेषत: जळगाव जिल्ह्यात वांग्याच्या भरिताला विशेष महत्त्व आहे. मोठ्या, भरदार हिरव्या- पांढऱ्या वांग्यांना तुरीच्या काड्यांवर (तुरकाड्या) भाजून त्यांची साल काढली जाते. त्यानंतर त्यात कांद्याची पात किंवा कांदा, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर आणि आवश्यकतेनुसार तेल व मीठ घालून तयार होणारे भरीत म्हणजे अस्सल खानदेशी खाद्यसंस्कृतीचा आत्माच! भाजलेल्या वांग्याचा धुरकट सुगंध, हिरव्या मिरचीचा झणझणीतपणा आणि कांद्याची चव यांचा संगम रसिकांच्या जिभेवर अविस्मरणीय ठसा उमटवतो. केळीच्या हिरव्यागार पानावर मांडलेल्या या मेजवानीचा लौकिक सातासमुद्रापारही पोहोचला आह..
भरितासोबत गरमागरम कळण्याची अथवा बाजरीची भाकरी, पिठलं, ठेचा, शेवभाजी आणि इतर पारंपरिक पदार्थांची जोड मिळाली की या मेजवानीची रंगत अधिकच खुलते. भरितासोबत प्रामुख्याने कळण्याची भाकरीच खाण्यास किमान जळगाव जिल्ह्यात तरी पसंती दिली जाते. पश्चिम खानदेशात धुळे जिल्ह्यात बाजरीची भाकरी जेवणात असते.. साध्या, स्थानिक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून तयार होणाऱ्या या पदार्थांत खानदेशच्या मातीचा सुगंध आणि ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब अनुभवायला मिळते. भरितासोबत कळण्याची भाकरी किंवा कळण्याच्या पुऱ्या, साध्या पुऱ्या देण्याचीही पद्धत आहे.
एकत्र येण्याचा आनंद, नात्यांचा गोडवा
जळगाव जिल्ह्यातील भरीत पार्टीचे खरे वैशिष्ट्य तिच्या चवीपेक्षा तिच्या सामूहिक स्वरूपात दडलेले आहे. लग्नसमारंभ, स्नेहमेळावे, कौटुंबिक कार्यक्रम, मित्रमंडळींच्या भेटी, सामाजिक उपक्रम किंवा हिवाळ्यातील निवांत दिवस अशा अनेक निमित्तांनी भरीत पार्टीचे आयोजन केले जाते. गावोगावी, शेतशिवारात, मळ्यांमध्ये आणि शहरांच्या परिसरात रंगणाऱ्या या पार्ट्यांमुळे माणसे एकत्र येतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नव्या नात्यांची वीण अधिक घट्ट होते. भरीत तयार करण्यापासून ते भाकऱ्या भाजण्यापर्यंत प्रत्येक जण आपापल्या परीने हातभार लावतो. कोणी वांगी भाजण्यात गुंतलेले असते, तर कोणी मसाले तयार करण्यात; कुणी चुलीची व्यवस्था पाहते, तर कुणी पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज असते. या सगळ्या लगबगीतून सहकार्य, श्रमप्रतिष्ठा आणि सामूहिकतेची भावना सहजपणे व्यक्त होते. पंगतीत बसून एकत्र भोजन करण्याचा आनंद हा या परंपरेचा सर्वांत सुंदर पैलू आहे.
लोकपरंपरेचा सांस्कृतिक आविष्कार
भरीत पार्टी हा खानदेशच्या लोकजीवनाचा असा उत्सव आहे, ज्यात खाद्यसंस्कृतीसोबत लोककला, लोकभाषा आणि लोकभावनांचाही संगम घडतो. अहिराणीतील गप्पा, विनोद, लोकगीते, जुन्या आठवणी आणि उत्स्फूर्त हास्य यांमुळे अशा मेळाव्यांना आपलेपणाची किनार लाभते. आधुनिक जीवनशैलीमुळे माणसांमधील संवाद कमी होत असताना भरीत पार्टीसारख्या परंपरा समाजाला पुन्हा एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात.आज सोशल मीडियाच्या माध्यमातून खानदेशी भरीत पार्टीची लोकप्रियता खानदेशच्या सीमांपलीकडेही पोहोचत आहे. शहरांमध्ये राहणारे खानदेशवासीय असोत किंवा परदेशात स्थायिक झालेले मराठी बांधव, भरीत पार्टीच्या निमित्ताने त्यांना आपल्या मातृभूमीशी आणि बालपणीच्या आठवणींशी पुन्हा जोडले गेल्याची अनुभूती मिळते. त्यामुळे ही परंपरा केवळ स्थानिक खाद्यवैशिष्ट्य न राहता खानदेशी अस्मितेचा अभिमान बनत आहे.
भरीत पार्ट्यांसाठी पर्यटन
जळगाव जिल्ह्यातील भरीत पार्ट्यांना अलीकडे ‘इव्हेंट’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिल्ह्यातील हौशी, खवय्ये लोक या सीझनमध्ये आवर्जून भरीत पार्ट्यांचे आयोजन करतात. नाशिक, पुणे, मुंबईतून खास भरीत पार्ट्यांसाठी येणाऱ्या खवय्यांची संख्या खूप मोठी आहे. काही वर्षांपूर्वी सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत जळगाव शहरातील सागर पार्कच्या मैदानावर तीन हजार क्विंटल वांग्यांच्या भरिताचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. स्वत: श्री. मनोहर यांनी हे भरीत बनवले आणि हजारो नागरिकांनी त्याचा आस्वादही घेतला.
परंपरेचे जतन, नव्या पिढीला वारसा
काळ बदलतो, जीवनशैली बदलते; मात्र आपल्या संस्कृतीची मुळे जपण्याची जबाबदारी कायम राहते. भरीत पार्टीसारख्या परंपरांचे जतन करताना स्वच्छता, अन्नाची नासाडी टाळणे, सुरक्षित पद्धतीने स्वयंपाक करणे आणि स्थानिक शेतमालाला प्राधान्य देणे यांनाही महत्त्व दिले पाहिजे. नव्या पिढीला या परंपरेमागील सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची ओळख करून दिल्यास हा वारसा अधिक समृद्ध होईल.
भरीत पार्टी.. माणुसकीचा उत्सव
भरीत पार्टी म्हणजे केवळ पोट भरण्याचा सोहळा नव्हे, तर मनांना जोडणारा, संस्कृतीला उजाळा देणारा आणि माणुसकीचा सुगंध दरवळणारा उत्सव आहे. वांग्याच्या भरिताची चव काही वेळात ओसरते; पण त्या निमित्ताने अनुभवलेला सहवास, हास्यविनोद आणि जिव्हाळा दीर्घकाळ मनात दरवळत राहतो. म्हणूनच खानदेशची भरीत पार्टी ही चवीपलीकडची परंपरा असून, ती खानदेशच्या अस्सल सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. अलीकडच्या काळात जळगावात भरीत या खास रेसिपीला व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. एकट्या जळगाव शहरात दोनशेवर भरीत- भाकरीचे स्टॉल, हॉटेल्स आहेत. धुळे, नाशिक आणि अगदी पुण्यातही खानदेशी भरिताचे स्टॉल्स असून त्यांना चांगला प्रतिसादही मिळतोय. भरिताच्या प्रत्येक घासात खानदेशची माती बोलते आणि प्रत्येक पंगतीत माणुसकीचे नाते अधिक दृढ होते...हाच या आगळ्यावेगळ्या सांस्कृतिक उत्सवाचा खरा गोडवा!
इन्फो...
भरिताच्या वांग्यांनाही आयएसओ मानांकन
जळगाव जिल्ह्यातील भरिताचे वांगे महाराष्ट्रातच नव्हे; तर खानदेशी लोक ज्या ज्या ठिकाणी वास्तव्याला आहे अशा प्रत्येक ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत. त्यातही पूर्व जळगाव जिल्ह्यात, म्हणजेच जळगाव शहराच्या पूर्वेकडील भुसावळच्या पुढच्या पट्ट्यातील वांग्यांना वेगळीच चव असून हे वांगे भरितासाठी उत्तम मानले जातात. भुसावळ शहरापासून अवघ्या पाच- सात किलोमीटर अंतरावरील बामणोद गावाचे वांगे जळगाव जिल्ह्यात खूप प्रसिद्ध आहेत. अभावानेच बिया असलेल्या या वांग्यांना ‘आयएसओ मानांकन’ प्राप्त असून एखाद्या फळभाजीला ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त होणे म्हणजे मोठे अप्रुपच.