खेडलेझुंगे- राज्य पायाभूत विकास महामंडळाच्या माध्यमातून खेडलेझुंगेसह परिसरात दोन-अडीच महिन्यांपासून रस्ता काँक्रिटीकरण सुरू आहे. त्यासाठी परिसरातील १५ किलोमीटरपेक्षाही जास्त लांबीचा रस्ता हा पूर्णपणे उकरून टाकला आहे. यामुळे रस्त्यावर माती, जाड-बारीक खडीसह मोठ्या प्रमाणात धूळ पसरली आहे. उखडलेल्या रस्त्यावरून वाहने जाताना धुळीचे लोट उडून त्यात समोरील व्यक्ती वा वाहनही दिसून येत नाही, अशी अवस्था आहे. हवेची दृश्यमानता इतकी कमी झाली आहे, की चार ते पाच फूट अंतरावर दिवसाही स्पष्टपणे दिसू शकत नाही. यामुळे जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे.