पान चार
-----------------
खोडाईमाता यात्रेसाठी आलेल्या
विक्रेत्यांची ओळख नोंद ठेवण्याची मागणी
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १२: येथील खोडाईमाता यात्रेसाठी बाहेरून आलेले व्यापारी, फेरीवाले, खेळणे, फुगे विक्रेते व पालखी, झुले यासारखे मनोरंजन साधने चालविणाऱ्या व्यक्तींची ओळख निश्चित होण्यासाठी आवश्यक ती नोंद ठेवण्यात यावी. यात्रा काळात कायदा व सुरक्षा कायम राहण्यासाठी पोलिस विभागाने उपाययोजना करावी, अशा मागणीचे निवेदन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी यांनी पोलिस अधिक्षक अश्विनी सानप यांना दिले.
नंदुरबार येथील श्री खोडाईमाता यात्रा सुरू झाली असून नवरात्र काळात भाविकांची मोठी गर्दी होत असते. मातेचा यात्रोत्सव २० ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात्रोत्सवानिमित्त बाहेर राज्यातून वा इतर जिल्ह्यातून अनेक छोटे-मोठे व्यापारी आणि फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी यात्रेत दाखल झाले आहेत. खाद्यपदार्थ विक्रेते तसेच झुले व इतर मनोरंजन साधने चालवणारे देखील यात्रेसाठी आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी सुव्यवस्था व सुरक्षेच्या दृष्टीने यात्रेत बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांची स्वतंत्र नोंद ठेवावी. संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, कायमचा पत्ता, मोबाईल क्रमांक, व्यवसायाचा स्टॉल आदी माहिती नोंदविली जावी. ओळख निश्चित करण्यासाठी आधार कार्डची प्रत घेणे अनिवार्य करावे. झुले पाळणे व इतर तांत्रिक मनोरंजन साधने चालवणाऱ्या व्यक्तींकडून संबंधित परवाने, सुरक्षा प्रमाणपत्रे व यंत्रांचे फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात यावे. प्रत्येक व्यापाऱ्याने मनोरंजन साधनाची माहिती व त्याच्याकडे काम करणाऱ्या मदतनीस कामगारांची संख्या नोंदवावी. यात्रेसाठी आवश्यक परवाने, पोलिस परवानगी, अग्नी सुरक्षा, विद्युत सुरक्षा, ध्वनीक्षेपक परवानगी तसेच इतर लागू परवाने तपासण्यात यावी, अशी मागणीही श्री. शिंपी यांनी केली आहे.