पान-१
VNI26B13305 ः श्री सप्तशृंगदेवीची मूर्ती
-----------------
३६-५
सप्तशृंगगडावर आजपासून कोजागिरी उत्सव
-------------
राज्यभरातून पवित्र जल घेऊन कावडधारी गडाकडे, उद्या श्री भगवतीची पंचामृत महापूजा
---------------
दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा
वणी, ता.२३ : आद्यशक्तिपीठ श्रीक्षेत्र सप्तशृंगगडावर शनिवारपासून (ता.२४) कोजागिरी पौर्णिमा उत्सवाला सुरवात होत आहे. महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातील विविध भागांतून हजारो कावडीधारकांनी आणलेल्या पवित्र जलाने श्री भगवतीच्या जलाभिषेकासाठी भाविकांची मांदियाळी असेल. भक्ती, श्रद्धा आणि शक्तिउपासनेचा अनोखा संगम असलेल्या या उत्सवात पदयात्रेने येणाऱ्या पालख्या, कावड यात्रांचे आगमन तसेच तृतीयपंथीयांच्या पारंपरिक छबिना मिरवणुका हे विशेष आकर्षण ठरणार आहे. मंगळवारी (ता.२७) शांतिपाठ आणि महाप्रसादाने सांगता होईल.
--------------------
देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते; मात्र कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्त गडावर भक्तीचा विशेष सोहळा अनुभवायला मिळतो. दूरवरून पायी प्रवास करीत, खांद्यावर कावड घेऊन आणि देवीच्या जयघोषात सहभागी होत भाविक गडावर दाखल होतात. नवसपूर्ती, मनोकामना आणि देवीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पवित्रजल अर्पण करण्याची परंपरा या उत्सवाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त करून देते.
रविवारी (ता. २५) सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. सकाळी ११.५६ ला कोजागिरी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ होणार आहे. दुपारी साडेबारा ते रात्री साडेआठपर्यंत महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध भागांतून कावडधारींनी आणलेले पवित्र जल श्री भगवती मंदिरात स्वीकारण्यात येईल. त्यानंतर रात्री नऊ ते मध्यरात्री बारापर्यंत या जलाने देवीचा जलाभिषेक आणि पंचामृत महापूजा केली जाणार आहे. कावडयात्रेत सहभागी होणारे भाविक अनेक किलोमीटरचा पायी प्रवास करीत देवीच्या चरणी जल अर्पण करण्यासाठी येतात. प्रवासातील कष्ट, देवीवरील अढळ श्रद्धा आणि सामूहिक भक्तिभाव यांमुळे या यात्रेला वेगळेच आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होते.
१६-१
पालखी, छबिना मिरवणुका
कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गडाकडे पदयात्रेने येणाऱ्या पालख्या आणि विविध भागांतून दाखल होणारे भक्तसमूह उत्सवाचे महत्त्व अधोरेखित करतात. तृतीयपंथीयांच्या पारंपरिक छबिना मिरवणुकाही या उत्सवातील वैशिष्ट्यपूर्ण भाग आहेत. पारंपरिक वेशभूषा, वाद्यांचा गजर आणि देवीच्या जयघोषात निघणाऱ्या या मिरवणुकांमधून धार्मिक परंपरेतील विविध घटकांचा सहभाग दिसून येतो. त्यामुळे गडावरील कोजागिरी उत्सवाला केवळ धार्मिक नव्हे, तर सांस्कृतिक आणि सामाजिक समन्वयाचेही महत्त्व प्राप्त होते.
------------------
१६-१
शांतीपाठ, महाप्रसादाने सांगता
सोमवारी (ता.२६) सकाळी सातला श्री भगवतीची पंचामृत महापूजा होईल. सकाळी ९.४१ ला कोजागिरी पौर्णिमा समाप्त होईल. मंगळवारी (ता.२७) रात्री आठला शांतिपाठ होणार असून, त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करून उत्सवाची सांगता केली जाईल. कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री भगवतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
--------------