फोटो : H33526
--
कोजागिरीच्या प्रहरी शास्त्रीय सुरांची उधळण
सूर विश्वास मैफलीत अपूर्वा रानडे यांचे गायन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २६ : कोजागिरी पौर्णिमेच्या प्रसन्न प्रहरी स्वरांच्या मधुर नजाकतीने रागदारीवर आधारित शास्त्रीय सुरांची उधळण करण्यात आली. नव्या पिढीतील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ ‘सूर विश्वास’ मैफलीचे ६७वे पुष्प रविवारी (ता. २५) सकाळी गुंफण्यात आले. सावरकरनगर येथील विश्वास गार्डन येथे गायिका अपूर्वा रानडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना सदानंद कानडे (तबला), भक्ती ब्रह्मे (संवादिनी) यांची त्यांना साथसंगत केली.
मिश्र गारा ठुमरीने मैफलीला सुरवात झाली. ठुमरीच्या उपशास्त्रीय गायनातील शब्दांमधील भाव, स्वरांची लवचिकता या गुणांना योग्य न्याय देण्यात आल्याने रागदारीच्या चौकटीतून भावभावनांचे सूक्ष्म पदर उलगडत गेले. त्यानंतर मिश्र पहाडी दादरा रचनेतून लोकसंगीताचा श्रवणानंदर श्रोत्यांनी अनुभवला. ठुमरी आणि दादरा दोन्ही गायन प्रकारांतून रानडे यांनी शास्त्रीय संगीताचे महत्त्व अधोरेखित केले. मैफलीच्या उत्तरार्धात मीराबाईंचे भजन सादर करण्यात आले. भजनातून कृष्ण भक्तीतील आर्तता, समर्पण आणि आध्यात्मिक ओढ यांचे संगीताशी असलेले नाते भजनातून रसिकांना अनुभवता आले. कलावंतांचा सन्मान रूपाली पैठणकर, पूजा ओक, डॉ. गोविंद मालपुरे यांनी केला. डॉ. स्मिता मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले.
--------