टुडे पान २ : मेन फिचर
---
(कोजागरीसंदर्भात दुधाचे चित्र वापरावे)
---
कोजागरीसाठी पाच लाख लिटर दुधाची मागणी
चंद्रप्रकाशात आज दुग्धप्राशन सोहळा; मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, महापूजा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२४ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त जिल्हा दूध संघाकडे तब्बल पाच लाख लिटर दुधाची आगाऊ नोंदणी झाली आहे. रविवार आणि सोमवारी नागरिकांना पुरेसा दूधपुरवठा उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती दूध संघाचे कार्यकारी संचालक शैलेश मोरखेडे यांनी दिली. दरम्यान, शहरातील विविध मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी मध्यरात्री चंद्रप्रकाशात ठेवलेल्या आटवलेल्या दुधाचा नैवेद्य दाखवून भाविकांना प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रम
सुभाष चौकातील भवानीमाता व महालक्ष्मी मंदिरात रात्री आठला भजन आणि मध्यरात्री आरती होईल. दक्षिणमुखी हनुमान मंदिरात सत्संग भजन मंडळातर्फे भजन, स्तोत्रपठण व आरतीचे आयोजन केले आहे. चिमुकले राम मंदिरात अंबाई देवीचा अभिषेक, आरती, दादा महाराज जोशी यांचे प्रवचन आणि दुधाचे वाटप होईल. इस्कॉन मंदिरात सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत तुलसी आरती, गौर आरती, विशेष दर्शन, कीर्तन आणि महाप्रसाद होईल. पिंप्राळा विठ्ठल मंदिरात सायंकाळी साडेसातला हरिपाठ व भजन, तर श्रीराम मंदिर संस्थानात रात्री आठला भजन आणि दुधाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे.
चौकट
कोजागरीचे महत्त्व
कोजागिरी पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. आश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मीचे पूजन करून रात्रजागरण करण्याची परंपरा आहे. या रात्री चंद्रप्रकाशात आटवलेले दूध ठेवून त्याचा नैवेद्य दाखविला जातो आणि नंतर प्रसाद म्हणून दुग्धप्राशन केले जाते. मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करून हा उत्सव भक्तिभावाने साजरा केला जातो.
चौकट
पौर्णिमेचे पूजन अन् जागरण
यंदा तिथीच्या वेळेमुळे धार्मिक विधी दोन दिवस होणार आहेत. रविवारी (ता. २५) मुख्य कोजागिरी पूजन, चंद्रपूजन, महालक्ष्मी पूजन आणि जागरण केले जाईल. सोमवारी (ता. २६) सकाळी उदयतिथीनुसार ज्येष्ठ अपत्याचे औक्षण आणि नवान्न प्राशनाचे विधी केले जाणार आहेत.