कृपया आवश्यक
फोटो- 27116
कोटमगाव : जगदंबामातेच्या यात्रेत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे पदाधिकारी.
येवल्यातील डॉक्टरांची कोटमगाव यात्रेत आरोग्यसेवा
नवरात्रोत्सवानिमित्त रोज करणार भाविकांची तपासणी
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. ११ : कोटमगाव येथील जगदंबा मातेच्या यात्रेत हजारो भाविक घटी बसले असून, लाखो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. या नऊ दिवसांत भाविकांची विविध आजारांची तपासणी व उपचार करून तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसीएशन आरोग्याचा जागर करणार आहे. रविवारी (ता. ११) या शिबिराचे उद्घाटन झाले.
कोटमगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त जगदंबा मातेची यात्रा भरली असून, येथे नवरात्रोत्सवानिमित्त सर्व भाविक व घटी बसलेल्या महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर होत आहे. शिबिराचे उद्घाटन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते झाले. शिबिराच्या माध्यमातून रोज सकाळी आठ ते दहा या वेळेत खोली नंबर दोनमध्ये मोफत आरोग्यसेवा दिली जाणार आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. तुषार साळुंखे यांनी सर्व भाविकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले. शिबिरात असोसिएशनचे सदस्य डॉ. ज्ञानेश धनगे, डॉ. शीतल भागवत, डॉ. योगेश जेजूरकर, डॉ. गणेश जेजूरकर यांनी उपस्थितांना विविध आजार व आरोग्याविषयी सविस्तर माहिती देऊन नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. जगदंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब कोटमे, उपाध्यक्ष भाऊसाहेब आदमाने, व्यवस्थापक राजेंद्र कोटमे, विश्वस्त मंडळ तसेच डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनतर्फे १२ ते १९ ऑक्टोबरदरम्यान हे शिबिर होणार आहे. शिबिरात सोमवारी (ता. १२) डॉ. तुषार साळुंके व डॉ. प्रतिक्षा साळुंके, मंगळवारी (ता. १३) डॉ. रोहन पाटील व डॉ. ज्ञानेश धनगे, बुधवारी (ता. १४) डॉ. अविनाश विंचू, डॉ. राम खोकले व डॉ. कृष्णा खैरनार, तर गुरुवारी (ता. १५) डॉ. संगीता पटेल व डॉ. महेश्वर तगारे सेवा देणार आहेत.
शुक्रवारी (ता. १६) डॉ. सुशांत पाटील, डॉ. अलंकार गायके व डॉ. धनराज काटे, शनिवार (ता. १७) डॉ. शीतल भागवत, डॉ. पल्लवी पाटील व डॉ. गणेश जेजूरकर, रविवार (ता. १८) रोजी डॉ. महेंद्र जैन, डॉ. योगेश जेजुरकर व डॉ. भरत कुलथे, तर सोमवार (ता. १९) रोजी डॉ. प्रणव राजपूत, डॉ. स्वप्नील जगताप, डॉ. सुजित एलमामे व डॉ. पल्लवी एलमामे हे भाविकांना आरोग्यसेवा देणार आहेत. धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक आरोग्याची जपणूक करणाऱ्या या उपक्रमाचा यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन आणि श्री जगदंबा देवस्थान ट्रस्टने केले आहे.
..............
कोट
यात्रेत दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक कोटमगावला येतात. या पार्श्वभूमीवर भाविकांना तातडीने आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी तसेच आवश्यक तपासणी व उपचार वेळेत मिळावेत, या सामाजिक बांधिलकीतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात विविध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर भाविकांची तपासणी करणार आहेत.
-डॉ. तुषार साळुंके, अध्यक्ष, तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन, येवला