लोगो -NSK26H31634
‘कृषीथॉन’चे २६ नोव्हेंबरपासून आयोजन
--------------------------------
माडसांगवीत १९ वे प्रदर्शन; ४० पिकांचे प्रात्यक्षिक
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ७ : भारतीय शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची दिशा देणाऱ्या ‘कृषीथॉन’ हे १९ वे प्रदर्शन २६ ते ३० नोव्हेंबरदरम्यान माडसांगवी येथे होणार आहे. ‘अधिक व्यापक... अधिक शाश्वत... अधिक संधी...’ ही यंदाची संकल्पना असून शेतकरी, कृषी उद्योजक, संशोधक आणि तज्ज्ञांना एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
कुंभमेळा आणि शहरातील विविध विकासकामांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंदाचे प्रदर्शन छत्रपती संभाजीनगर रोडवरील माडसांगवी येथे आयोजित केले आहे. मुंबई, पुणे, दिंडोरी आणि आग्रा रोडकडून येणाऱ्या शेतकऱ्यांना शहरात प्रवेश न करता थेट प्रदर्शनस्थळी पोहोचता येणार आहे. प्रशस्त प्रदर्शन हॉल, पार्किंग व्यवस्था आणि पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करण्यात आली आहे. प्रदर्शनात ३०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्टॉल्स असतील. हायटेक ट्रॅक्टर, कृषी अवजारे, सूक्ष्म व तुषार सिंचन, सौर पंप, ड्रोन, एआय सेन्सर्स, बियाणे, सेंद्रिय खते, ग्रीन हाउस, अन्न प्रक्रिया आणि गोठा व्यवस्थापनाचे तंत्रज्ञान पाहता येणार आहे. ४० हून अधिक पिकांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके तसेच पाचही दिवस कृषी तज्ज्ञ, अधिकारी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांची चर्चासत्रे होणार असून हवामान बदल, जलसंधारण, मृदा आरोग्य, पीक संरक्षण, मूल्यवर्धन आणि निर्यात यावर मार्गदर्शन केले जाणार आहे.
‘कृषीथॉन सन्मान २०२६’मध्ये प्रयोगशील शेतकरी, कृषी उद्योजक, संशोधक, कृषी विस्तार कार्य आणि गुणवंत विद्यार्थ्यांसह सहा गटांतील गुणवंतांचा गौरव करण्यात येणार आहे. दरवर्षी १.२५ लाखांहून अधिक शेतकरी, ३०० हून अधिक प्रदर्शनार्थी आणि ५ कोटींहून अधिक डिजिटल प्रेक्षक या प्रदर्शनाशी जोडले जातात, असेही न्याहारकर यांनी सांगितले.