फोटो : H31393
कृष्णा चांदगुडे यांना
कार्यगौरव पुरस्कार प्रदान
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : सामाजिक कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना भटके विमुक्त समाजाचा कार्यगौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. राज्यभर कार्यरत असणाऱ्या भटका विमुक्त शोषित समुदाय संघर्ष संघटनेतर्फे या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
पुणे येथे सानेगुरुजी स्मारक येथे झालेल्या समारंभात नाशिक - त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचे अतिरिक्त आयुक्त प्रमोदकुमार पवार, नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू अशोक महाजन यांच्या हस्ते चांदगुडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जातपंचायतीच्या मनमानीविरोधातील केलेल्या कामाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. कृष्णा चांदगुडे हे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जातपंचायत मूठमाती अभियानाचे राज्य कार्यवाह आहे. जातपंचायतीच्या विरोधातील लढ्यामुळे २०१६ ला राज्य सरकारने ‘सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा’ संमत केला. त्यात चांदगुडे यांचा प्रमुख सहभाग होता. चांदगुडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रा. शिवाजी जोशी, लेखक नारायण भोसले, ॲड. अरुण जाधव हे उपस्थित होते.