फोटो -NSK26H34392
नाशिक : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना प्रदर्शनाचे निमंत्रण देताना ‘कृषीथॉन’चे सहआयोजक साहिल न्याहारकर.
कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत
होणार ‘कृषीथॉन’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, नवकल्पना आणि संशोधनाचा संगम ठरणारे ‘कृषीथॉन २०२६’ हे आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन येत्या २६ ते ३० नोव्हेंबर २०२६ दरम्यान नाशिकच्या माडसांगवी येथे होणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.
प्रदर्शनाचे सहआयोजक साहिल न्याहारकर यांनी नुकतीच कृषिमंत्री भरणे यांची भेट घेऊन कार्यक्रमाचे औपचारिक निमंत्रण दिले. त्या भेटीत मंत्री भरणे यांनी ‘कृषीथॉन’द्वारे शेतकऱ्यांपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले. ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन आणि मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १९ वे प्रदर्शन नाशिक येथील माडसांगवी (शिलापूर टोल नाक्याजवळ, छत्रपती संभाजीनगर रोड, नाशिक) येथे पार पडणार आहे. यंदाच्या प्रदर्शनात देश-विदेशातील ३०० हून अधिक कृषी कंपन्या, संशोधन संस्था आणि स्टार्टअप्स सहभागी होणार असून १.२५ लाखांहून अधिक शेतकरी, उद्योजक आणि संशोधक या प्रदर्शनाला भेट देतील असा अंदाज आयोजकांनी व्यक्त केला आहे.
यंदा राज्यात असलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शनात कमी पाण्यात पिकांचे संगोपन, सूक्ष्म सिंचन आणि जलव्यवस्थापनाबाबत विशेष ''चर्चासत्रे'' आयोजित केली जाणार आहेत. या तांत्रिक सत्रांद्वारे कृषी तज्ज्ञ शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करतील. पाच दिवस चालणाऱ्या या भव्य प्रदर्शनात अत्याधुनिक शेती यंत्रसामग्री, ड्रोन प्रात्यक्षिके, सेंद्रिय शेती आणि स्मार्ट सिंचन प्रणालीचे प्रदर्शन होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.