पान एक ॲंकर
-------------------
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिंदे मळ्यात तात्पुरते वाहनतळ
१ हेक्टर ९३ आर जमीन अधिग्रहणाचा कुंभमेळा प्राधिकरणाचा प्रस्ताव
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २० : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी व्यवस्थापनाची तयारी वेगाने सुरू केली आहे. ध्वजारोहण सोहळा आणि पर्वणी काळात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन नाशिक शिवारातील शिंदे मळा येथील जमीन तात्पुरत्या वाहनतळासाठी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिंदे मळा परिसरातील १ हेक्टर ९३ आर क्षेत्र तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहित करण्यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवला आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त कुंभ आयुक्त कमलाकर रणदिवे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेला याबाबत पत्र दिले आहे. सुधारित प्रस्तावानुसार कायदेशीर प्रक्रिया विहित मुदतीत पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी १५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२६ या काळात या जागेचा वाहनतळ म्हणून वापर होणार आहे. त्यानंतर पर्वणी काळासाठी म्हणजेच १ नोव्हेंबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या संपूर्ण वर्षभरात अंतर्गत वाहनतळ, होल्डिंग एरिया आणि स्टेजिंग एरिया म्हणून ही जागा वापरली जाणार आहे. -------गोदाघाटावरील गर्दीसाठी नियोजन गोदावरी स्नानघाट परिसरात गर्दी वाढल्यास भाविकांना सुरक्षित ठिकाणी थांबवता यावे, यासाठी महसूल आणि शहर पोलिसांनी संयुक्तपणे या जागेची पाहणी केली आहे. या ठिकाणी भूसपाटीकरण, बॅरिकेडिंग उभारणे, येण्या-जाण्यासाठी स्वतंत्र मार्ग आणि पथदिवे बसवण्याचे नियोजन आहे.
------------
पारदर्शकतेवर भर
भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जमिनीची संयुक्त मोजणी, ताबा घेताना आणि परत करताना व्हिडिओग्राफी, छायाचित्रांचे जिओटॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. मोजणीपूर्वी अक्षांश-रेखांश निश्चित करून पंचनामा करण्याचे आदेश आहेत. जमीनमालकाला द्यायचे भाडे आणि नुकसानभरपाई कायद्यानुसार निश्चित करून वेळेत निवाडा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.