पान एक मेन
---------------------
34059
नाशिक : तपोवन येथे ग्रामपरिक्रमेपुर्वी कुंभमेळ्याच्या ध्वजाचे पूजन करण्यात आले,यावेळी उपस्थित कुंभमेळामंत्री गिरीष महाजन, रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्य महाराज, अखिल भारतीय अखाड़ा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता महंत संजयदास महाराज, श्रीमहंत निर्वाणी अखाड़ा महंत मुरलीदास महाराज, महासचिव निर्वाणी अनी महंत सत्यदेव दास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत हेमंतदास महाराज, नगराध्यक्षा साधना महाजन (जामनेर) ,आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आडके आदी.
34002
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी रामतीर्थ परिसरात तयार करण्यात आलेले व्यासपीठ.
34040
नाशिक : तपोवन येथून काढण्यात आलेल्या आलेली शोभायात्रेत तुतारी वाजवताना भाविक.
34041
नाशिक : शोभायात्रेत शंखनाद करत करत असलेले भाविक.
34042
नाशिक : शोभायात्रेच्या रथात बसलेले महंत ग्यानदास महाराज, महंत संजयदास महाराज, सतीश शुक्ल आदी.
34045
नाशिक : तपोवन येथून पारंपारिक वाद्याच्या तालात काढण्यात आलेली शोभायात्रा.
गंगापूजनाने सिंहस्थ कुंभमेळा धार्मिक विधींना सुरुवात
ध्वजस्तंभ पूजन, प्रधान संकल्पासह अमृतकुंभ परिक्रमा; साधू-महंतांची उपस्थिती
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, पंचवटी, ता. ३० : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ३०) रामतीर्थ परिसरात गोदावरीचे गंगापूजन, तीर्थपूजन आणि प्रधान संकल्प विधी धार्मिक वातावरणात झाले. वैदिक मंत्रोच्चार, पारंपरिक पूजाविधी आणि संत-महंतांच्या सान्निध्यात झालेल्या या विधींमुळे सिंहस्थ महापर्वाच्या धार्मिक कार्यक्रमांना मंगलमय प्रारंभ झाला.
यावेळी नरेंद्राचार्य महाराज, धर्मसम्राट श्री महंत ग्यानदास महाराज, वैष्णव संप्रदायातील श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी आखाडा, श्री पंच रामानंदीय दिगंबर अनी आखाडा आणि श्री पंच रामानंदीय निर्मोही अनी आखाडा या तिन्ही प्रमुख आखाड्यांचे श्रीमहंत, मंगलपीठाधीश्वर माधवाचार्य, पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, आमदार राहुल ढिकले, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे यांच्यासह विविध पीठांचे पीठाधीश्वर, स्थानिक साधू-महंत, विविध संप्रदायांचे प्रतिनिधी सहभागी झाले.
श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या वतीने सिंहस्थ ध्वजारोहणानिमित्त तीन दिवसीय ध्वजदंड प्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यज्ञविद्या वाचस्पती वेदमूर्ती भालचंद्र एकनाथशास्त्री शौचे गुरुजी आणि यज्ञाचार्य पंडित वैभव दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त व वेदोक्त पद्धतीने हे धार्मिक विधी होत आहेत. कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महापालिकेच्या सहकार्याने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याच्या आयोजनासाठी श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे प्रमुख विश्वस्त सतीश शुक्ल, अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, वैभव दीक्षित, सरचिटणीस प्रतीक शुक्ल आणि कार्याध्यक्ष शेखर शुक्ल यांनी मार्गदर्शन केले.
-----------
नगरप्रदक्षिणेनंतर विधींना प्रारंभ
शुक्रवारी सकाळी नगरप्रदक्षिणेनंतर प्रायश्चित्त संकल्पपूर्वक तीर्थपूजन, पंचार्घ्य प्रदान, प्रधान संकल्प, गणेशपूजन, पंचांग विधान, ब्राह्मण वरण, प्रधान देवता स्थापना आणि नवग्रह रुद्र स्थापना हे विधी करण्यात आले. गोदावरी नदीचे धार्मिक महत्त्व आणि सिंहस्थ पर्वाची परंपरा यांचा संगम या पूजन सोहळ्यात अनुभवायला मिळाला. दुपारनंतर स्नपन विधान, नवग्रह हवन, प्रतिष्ठापना हवन, धान्याधिवास, शय्याधिवास, सायंपूजन आणि श्री गोदावरी प्रार्थना असे धार्मिक विधी झाले. दिवसभराच्या या मंगल मंत्रांच्या स्वरांनी गोदावरीचा काठ उजळून निघाला.