कुंभमेळ्याच्या तयारीला वेग
आज उच्चस्तरीय बैठक
नाशिक, ता. २ : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पूर्वतयारीला वेग आला असून, विविध विभागांतील कामांचा समन्वय साधण्यासाठी शनिवारी (ता. ३) उच्चस्तरीय बैठक होणार आहे. जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तथा नाशिकचे पालक सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता त्र्यंबक नाका येथील नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या समिती सभागृहात बैठक होईल.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी पोलिस, महसूल, महापालिका, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, एसटी महामंडळासह संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना बैठकीस उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीत वाहतूक नियोजन, गर्दी नियंत्रण आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला जाणार आहे. प्रस्तावित वाहनतळांची ठिकाणे व क्षमता, प्रवेश-निर्गमन मार्ग, अंतर्गत वाहतूक व्यवस्था आणि दिशादर्शक फलकांची ठिकाणे निश्चित करण्याबाबत निर्णय होणार आहे.
साधुग्रामच्या अंतिम आराखड्यासह अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निसुरक्षा आणि विद्युत व्यवस्थेवरही चर्चा होईल. तसेच नागरी व तात्पुरत्या विद्युत कामांच्या अंदाजपत्रकांचा आढावा घेतला जाणार आहे.
साधुग्राम आणि वाहनतळांसाठी आवश्यक जमिनींची उपलब्धता, सद्यःस्थिती व भूसंपादन प्रक्रियेबाबत संबंधित विभागांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. याशिवाय प्रस्तावित घाटांची रचना, भाविकांचे ये-जा मार्ग, सुरक्षा, प्रकाश व्यवस्था आणि नागरी सुविधांचा विचार करून घाटांच्या अंतिम लेआऊटवरही निर्णय होण्याची शक्यता आहे.