कुंभमेळ्यासाठी बँकिंग यंत्रणा सज्ज
रोख मर्यादा वाढणार; मोबाईल एटीएम, डिजिटल व्यवहार आणि बँकिंग सेवांचा विस्तार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ६ : सिंहस्थ महाकुंभमेळ्यात लाखो भाविक, पर्यटक आणि नागरिकांना अखंडित वित्तीय सेवा मिळाव्यात, यासाठी जिल्ह्यातील रोख तसेच डिजिटल बँकिंग व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी रोख मर्यादा वाढविणे, मोबाईल एटीएमची सुविधा उपलब्ध करणे आणि डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय बँकर्स समितीची उच्चस्तरीय बैठक झाली. भारतीय रिझर्व्ह बँक, वित्तीय सेवा विभाग आणि विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिकच्या वित्तीय व पायाभूत सुविधांच्या आवश्यकतांचे सादरीकरण केले.
कुंभमेळ्याच्या वित्तीय व्यवस्थेचा अंतिम आराखडा निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. ९) आरबीआयच्या पुढाकाराने सर्व बँकांची विशेष बैठक होणार आहे. यात रोख पुरवठा, एटीएम, मोबाईल एटीएम, कॅश चेस्ट आणि डिजिटल व्यवहारांच्या सुविधांचे अंतिम नियोजन केले जाईल.
रोख मर्यादा वाढणार
नाशिकची सध्याची सुमारे ६ हजार कोटी रुपयांची रोख मर्यादा वाढविण्यासाठी आरबीआय बेलापूरकडून सकारात्मक कार्यवाही करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यातील वाढीव रोख मागणी लक्षात घेऊन बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यावर बैठकीत भर देण्यात आला. कुंभमेळा क्षेत्रातील वाहनतळ, साधुग्राम, प्रमुख नदीघाट आणि अन्य गर्दीच्या ठिकाणी मोबाईल एटीएम वाहने उपलब्ध करून देण्यात येतील.
डिजिटल व्यवहारांवर भर
लहान विक्रेते, वाहतूक सेवा पुरवठादार आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये पीओएस यंत्रांची संख्या वाढविण्यात येणार आहे. यूपीआय व्यवहारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देतानाच ई-केवायसी प्रक्रियेतील अडचणी दूर करण्यात येतील. दुर्गम आणि गर्दीच्या भागात बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी बँकिंग कॉरस्पाँडंटचे जाळेही विस्तारण्यात येणार आहे.