----------------
सिंहस्थाचे ३५ हजार कोटी कुठे गेले?
आमदार रोहित पवार ः धर्माच्या नावावर भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ४ ः सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावर ३५ हजार कोटींचा खर्च दाखवला जातोय, पण जमिनीवर तेवढी कामे कुठेच दिसत नाहीत, असा थेट आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. चांगले रस्ते उकरून ठेवले, त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यांत पडून १५ ते १६ नाशिककरांना जीव गमवावा लागला. काम व्हावे हीच आमची भूमिका आहे, पण धर्माच्या नावावर भ्रष्टाचार खपवून घेणार नाही, असा इशारा आमदार पवार यांनी दिला.
आमदार पवार यांनी सिंहस्थ कुंभमेळा कामांबाबत माहिती मिळत नसल्याने आक्षेप घेतले आहेत. त्याअनुशंगाने नाशिक दौऱ्यावर आलेल्या आमदार पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, प्रयागराज कुंभमेळ्यात एका दिवसात १६ कोटी भाविक आले तरी खर्च सात हजार कोटी रुपये झाला होता. मग नाशिकमध्ये ३५ हजार कोटींची कामे कुठे सुरू आहेत, याचा शोध घेणार आहे. याबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि कुंभ आयुक्तांना पत्र दिले असून माहिती देण्यासाठी १० दिवसांची मुदत दिली आहे. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळच्या लोकांचा ७ ते ८ हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढणार, सीएसआरची झाडे तोडून हॉटेल बांधणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करणार, असा इशाराही त्यांनी दिला.
गोदावरीत रासायनिक पाणी सोडणाऱ्या कंपन्यांवर कारवाईसाठी एमआयडीसी व प्रदूषण मंडळाला २० दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. रिंगरोडला परवानगी नाही, शेतकऱ्यांना मोबदला नाही, संतांच्या नावाने राजकारण करून त्यांच्यावर एक रुपयाही खर्च होत नाही, अशी टीकाही त्यांनी केली. एमआयडीसी आणि प्रदूषण विभागाला वीस दिवसांची मुदत देताना आमदार पवार यांनी रसायनयुक्त पाणी गोदावरीत मिसळते, त्यावर काम न केल्यास महागात पडेल असा इशारा दिला.
---------------------
पार्थ-जयमध्ये वितुष्टाचा प्रयत्न
मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांचे पटत नसल्याने भाजपला राष्ट्रवादीवर पूर्ण नियंत्रण हवे आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. यासाठी भाजप ''चाणक्य नीती'' वापरून पार्थ पवार आणि जय पवार या दोघा भावांमध्ये जाणीवपूर्वक द्वेष पसरवत असून पार्थ आणि सुनेत्रा पवार यांना एकटे पाडत असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षातील काही ''अतृप्त आत्मे'' यासाठी वापरले जात आहेत. जय पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, पण फडणवीसांचे गोड शब्द ऐकून भुलू नका, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने सावध पावले उचला, असा सल्ला पवार यांनी दोघांना दिला. भुजबळ आणि मुश्रीफच पार्थ- काकींच्या पाठीशी असल्याचेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेपूर्वी आमदार पवार यांनी रामकुंड परिसरातील कामांची पाहणी केली. नंतर श्री. काळाराम मंदिरात दर्शन घेतले.
---------------------