३६-२
कुंभमेळा प्राधिकरणाचे
इन्स्टावर बनावट खाते
-----------
सायबर पोलिसात गुन्हा दाखल
----------
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता.१५ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे अधिकृत खाते असल्याचे भासवून नागरिकांची दिशाभूल करणारे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पेट्रोलिंगदरम्यान प्रकार समोर आला असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
------------
शहर सायबर पोलिसांची रविवारी (ता.१५) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सायबर पेट्रोलिंग सुरू होती. इन्स्टाग्रामवरील ''ऑफिशियल.कुंभनगरी_नाशिक'' या खात्याची पाहणी करण्यात आली. या खात्यावर सिंहस्थ कुंभमेळ्याशी संबंधित विविध कार्यक्रमांचे रिल्स आणि पोस्ट प्रसारित करण्यात येत होते. मात्र, संबंधित खाते पाहिल्यानंतर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, नाशिक या शासकीय कार्यालयाचे अधिकृत सोशल मीडिया पेज असल्याचा आभास निर्माण केला. नागरिकांची दिशाभूल केली जात असल्याचे यावरून निदर्शनास आले. शासकीय यंत्रणेचे अधिकृत खाते असल्याचे भासवून माहिती प्रसारित केल्याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल.
कुंभमेळा तसेच शासकीय योजना आणि विविध कार्यक्रमांसंदर्भातील माहिती नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत आणि सत्यापित सोशल मीडिया खात्यांवरूनच घ्यावी, सोशल मीडियावरील कोणत्याही खात्याला शासकीय अधिकृत पेज समजण्यापूर्वी त्याची सत्यता तपासावी. बनावट खात्यांवरील माहिती, लिंक किंवा संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.