फोटो : H34103
ध्वजारोहणाचे ‘मिनिट टू मिनिट’ नियोजन
भव्यदिव्य सोहळा; प्रशासनाचा सोडला सुटकेचा निःश्वास
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहणाप्रसंगी काही बाबी वगळता हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. ‘मिनिट टू मिनिट’ नियोजनामुळे सर्व सोहळा पार पडल्याने सिंहस्थ प्राधिकरण तसेच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला.
सिंहस्थ कुंभमेळा पर्वास शनिवारी (ता. ३१) राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. यानिमित्त गोदाघाटावर भक्ती आणि शक्तीचा संगम अनुभवायला मिळाला. या सोहळ्याची प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. पहाटेपासूनच रामतीर्थाकडे येेणाऱ्या प्रमुख मार्गांवर भक्तीमय वातावरण होते. तिन्ही वैष्णव आखाड्यांचे प्रमुख साधू- महंत, देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध महंत तसेच केंद्र व राज्यातील मंत्री तसेच निरनिराळ्या मान्यवरांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. प्रशासनातर्फे या सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री आदी वरिष्ठ अधिकारी सोहळ्याच्या नियोजनावर बारकाईने लक्ष ठेवून होेते.
---
खासदार-आमदारांच्या खुर्चीवर कब्जा
गंगा गोदावरी पुरातन मंदिरालगत साधू महंत तसेच आमदार-खासदारांसाठी आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र, लोकप्रतिनिधी येण्यापूर्वीच काही नागरिकांनी खुर्च्यांवर कब्जा केला. परिणामी नंतर आलेल्या लोकप्रतिनिधींना जागाच शिल्लक राहिली नाही. अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वत: जागेवर जाऊन लोकप्रतिनिधींना खुर्च्या उपलब्ध करून दिल्या. दरम्यान, राष्ट्रपतींच्या हस्ते पूजन सुरू असताना वारंवार स्क्रीन बंद पडत होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना पूजनाचा सोहळा व्यवस्थित बघता आला नाही.
-----------
कमान हटवली
पुरातन गोदावरी माता मंदिरावर सिंहस्थ कुंभमेळा रामतीर्थ अशी फुलांची सजावट असलेली कमान उभारण्यात आली होती. परंतु, राष्ट्रपती यांच्या आगमनापूर्वीच या कमानीवरील काही फुल गळून पडली. परिणामी ही कमान योग्य दिसत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर कमान हटविण्याचे सूचना केल्या. त्यानुसार तातडीने ही कमान काढण्यात आली.