पान-३
-----------
देशभरातील साधू- महंतांचे आगमन सुरू
तेरा आखाड्यांच्या एकत्रिकरणानंतर आगमनाला वेग
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्मध्वजारोहण सोहळ्याने कुंभपर्वाचा धार्मिक शुभारंभ झाला आहे. या सोहळ्यानिमित्त नाशिकचे तीन वैष्णव आणि त्र्यंबकेश्वरचे दहा शैव, उदासीन व निर्मल परंपरेतील असे तेरा आखाडे एकाच व्यासपीठावर आले आहेत. सुमारे दोनशे वर्षांनंतर घडलेल्या या ऐतिहासिक एकत्रिकरणानंतर सर्व आखाड्यांच्या साधू-महंतांनी स्वामीनारायण मंदिरात एकत्रित भोजनही केले. त्यामुळे शैव- वैष्णव एकात्मतेचा संदेश देशभर पोहोचला असून आता विविध आखाड्यांचे साधू, महंत आणि नागा साधू नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झालेल्या प्रमुख संत- महंतांमध्ये जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री तथा अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरीगिरी, निरंजनी आखाड्याचे सचिव श्रीमहंत रवींद्र पुरी, आवाहन आखाड्याचे आंतरराष्ट्रीय महामंत्री श्रीमहंत सत्य गिरी, बडा उदासीन आखाड्याचे श्रीमहंत दुर्गादास, आनंद आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती, निर्मल आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमहंत देवेंद्रजी आणि नया उदासीन आखाड्याचे श्रीमहंत भगत रामजी यांचा समावेश आहे.
शृंगेरी पीठाचे शंकराचार्य स्वामी विधुशेखर भारती यांचीही त्र्यंबकेश्वरमधील सोहळ्याला उपस्थिती होती. नाशिकमध्ये वैष्णव परंपरेतील श्री पंच रामानंदीय निर्वाणी अनी, श्री पंच रामानंदीय दिगंबर अनी आणि श्री पंच रामानंदीय निर्मोही अनी या तीन आखाड्यांचे संत- महंत सहभागी झाले होते. श्रीमहंत ग्यानदास महाराज आणि मंगलपिठाधीश्वर माधवाचार्य यांच्यासह विविध धर्माचाऱ्यांची उपस्थिती होती.
१६-१
व्यवस्थांसाठी हालचाली सुरू
सिंहस्थातील परंपरेनुसार नाशिकच्या रामतीर्थावर तीन वैष्णव आखाड्यांचे तर त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थावर दहा आखाड्यांचे अमृतस्नान होणार आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी साधू-महंतांच्या निवास, आखाड्यांच्या सुविधा, अन्नछत्र आणि धार्मिक व्यवस्थांच्या हालचालींना वेग येत आहे. आगामी काळात देशाच्या विविध भागांतून आखाड्यांचे महंत, महामंडलेश्वर, नागा साधू आणि अनुयायी टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. नाशिक- त्र्यंबकेश्वरमध्ये सिंहस्थाचे धार्मिक वातावरण अधिक गडद होत आहे.
---------------