उतावीळ रिल्स ‘स्टार’ची पोलिसांनी ‘उतरवली’
----------
सिंहस्थ ध्वजारोहण : पोलिसांवरील टीका भोवली
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३ : सिंहस्थाचा भव्य ध्वजारोहण सोहळा राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंच्या उपस्थितीत सुरक्षिततेच्या कडेकोटवेढ्यात पार पडला. व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा ताण, शहरात जागोजागी लागलेली नाकाबंदी अन् खाकीचा कडक बंदोबस्त... साहजिकच काही नागरिकांना या बंदोबस्ताचा फटका बसला आणि काही ठिकाणी नाक्यावर पोलिसांशी हमरीतुमरीचे उडणेही स्वाभाविक ठरले. पण खरा प्रकार पुढे घडला..! बंदोबस्तातील हाच ताणतणाव अन् किरकोळ बाचाबाची टिपून सोशल मीडियावरील ‘रिल्स स्टार्स’नी खाकीची नाहक नाचक्की करायचा उद्योग मांडला. व्ह्यूज आणि लाईक्सच्या भुकेपोटी तडका देऊन पोलिसांना खलनायक ठरवणारे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल केले गेले. मात्र, कायदा बासनात गुंडाळून स्वतःला ‘बाप’ समजणाऱ्या या उतावळ्या रिलस्टारांना ही हुशारी भलतीच अंगलट आली आहे. पोलिस आयुक्तालयाने या व्हायरल व्हिडिओची तातडीने गंभीर दखल घेत या हौशा-नवश्या अन् कायदा तुडवणाऱ्या रिलस्टार्सना थेट ठाण्यातच पाचारण केले.
पोलिस ठाण्यात पाय ठेवताच, कायदा आणि सुरक्षेच्या नियमांशी अनभिज्ञ असलेल्या या ज्ञान पाजाळणाऱ्या रिल्सवीरांचे अवसान पार गळून पडले. खाकीने कायद्याची खाक्या दाखवून कडक जाणीव करून देताच, सोशल मीडियावर बाशिंग बांधून फिरणाऱ्या या मंडळींनी पोलिसांसमोर नाक घासून बिनशर्त माफी मागितली.
''नकारात्मकतेचाच उबाळा कशासाठी?''
या कारवाईनंतर पोलिस आयुक्तालयाने ‘चुकीचे घडत असेल तर नक्की दाखवा, पण व्ह्यूजसाठी खाकीची नाहक बदनामी करून सोशल मीडियावर प्रसिद्धीची चटक भागवू नका’ असेच या उतावीळ रिल्सस्टारला सुनावले. बंदोबस्तात अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांच्या सकारात्मक बाबींचीही दखल घेण्याचे आवाहन करत, ज्या नागरिकांनी आणि माध्यमांनी पोलिसांची सहकार्याची बाजू मांडली, त्यांचे आयुक्तालयाकडून कौतुकही करण्यात आले.