कुंभमेळा पुढे ढकलून शेतकऱ्यांना मदत करा!
--
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची मागणी; सरकारवर टीकास्त्र
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १४ : आम्ही माणसात देव पाहतो. अन्न पिकविणारा शेतकरी हाच देव आहे. त्यामुळे आगामी कुंभमेळा चार ते पाच वर्षे पुढे ढकला. तोच ३५ हजार कोटी रुपयांचा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी खर्च करा. परिस्थिती पूर्ववत झाल्यावर कुंभमेळा घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केली.
शहरातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारवर टीका केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी श्री. तुपकर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत.
श्री. तुपकर म्हणाले, की राज्यभरात दुष्काळाने शेतकरी होरपळला आहे. मात्र, सरकारला कामांचा प्राधान्यक्रम कळत नाही. मागणी नसताना सव्वा लाख कोटी रुपये खर्चून शक्तिपीठ महामार्ग बांधला जात आहे. हा निधी, कुंभमेळ्याचा निधी आणि आमदारांचा पाच कोटी रुपयांचा निधी दुष्काळ निवारणासाठी वळवावा. आमदार निधीतून मंदिरे किंवा सभागृहे न बांधता पिण्याचे पाणी, चारा व अन्नाची सोय करावी. दुष्काळामुळे आमदारांचे पगार तीन वर्षे बंद करावेत. सरकार सत्यमापनाच्या नावाखाली पंचनामे करून वेळ काढत आहे. रोज २५ शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. सरकारने दहा दिवसांत निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा श्री. तुपकर यांनी दिला.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, महिला प्रदेशाध्यक्षा चैताली शेलार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष ईश्वर पाटील, जिल्हाध्यक्ष किशोर पाटील, अभिलाल पाटील, आनंदा पाटील, सुयोग पाटील उपस्थित होते.