सिंहस्थात यंत्रणांचा समन्वय महत्वाचा : डवले

सिंहस्थात यंत्रणांचा समन्वय महत्वाचा : डवले
Published on: 
सिंहस्थात यंत्रणांचा समन्वय महत्त्वाचा एकनाथ डवले : तयारीचा आढावा; कामे वेळेत पूर्ण करावी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १७ : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी त्यांच्या पातळीवरील कामांचे नियोजन करताना एकमेकांशी समन्वय राखावा. कामांच्या सद्यःस्थितीची अद्ययावत माहिती ठेवताना प्रलंबित कामांच्या मान्यता व तांत्रिक अडचणी वेळेत सोडवाव्या, असे निर्देश जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव एकनाथ डवले यांनी आज येथे दिले. जुन्या जिल्हा परिषदेतील सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात शनिवारी (ता.१७) डवले यांनी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने वाहनतळ, वाहतूक मार्ग, दिशादर्शक फलक, साधुग्राममधील पायाभूत सुविधा तसेच घाट विकासाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय येनपुरे, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक डी. एस. स्वामी यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. डवले म्हणाले, भाविकांना महत्त्वाचे मार्ग, वाहनतळ आणि सुविधांची ठिकाणे सहज शोधता आली पाहिजेत. त्यासाठी दिशादर्शक फलक कुठे लावायचे व त्यांची रचना कशी असावी या दृष्टीने नियोजन करावे. विविध विभागांच्या कामांमध्ये सुसूत्रता राखणे, जबाबदाऱ्या स्पष्ट ठेवणे आणि कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे आवश्यक असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले. यावेळी विविध विभागांच्या कामांची सद्यःस्थिती, प्रलंबित मान्यता, तांत्रिक तपशील व कामांची अंतिम मुदतीसंदर्भातील माहिती सादर करण्यात आले. साधुग्राममधील सुविधांवर लक्ष साधुग्रामच्या नियोजित आराखड्यासह उपलब्ध जागा, अंतर्गत रस्ते व नागरी कामांचा आढावा घेण्यात आला. साधू-महंतांच्या निवासासाठी आवश्यक पाणीपुरवठा, स्वच्छता, वीजपुरवठा, प्रकाशव्यवस्था आणि इतर मूलभूत सुविधांचे नियोजन एकत्रितपणे करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या कामांशी संबंधित सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवून कामे वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, अशा सूचना डवले यांनी दिल्या. घाटविकासाचा आढावा नदीघाटांवरील कामे व त्यांना पूरक नागरी सुविधांचे नियोजन कुंभमेळ्याच्या प्रत्यक्ष व्यवस्थापनाच्या गरजा लक्षात घेत करावे, असे निर्देश पालकसचिव डवले यांनी दिले. कुंभमेळ्यातील पायाभूत सुविधा, वीज व पाणीपुरवठा, वाहतूक व्यवस्था आणि भाविकांसाठीच्या सुविधा या एकमेकांशी जोडलेल्या असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करणे महत्त्वाचे असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com