लखमापूरची पाण्यासाठी प्रतीक्षा कायम
विहीर व पंपगृहासाठी जागा निश्चित नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
सटाणा, ता. ७ : जलजीवन मिशनअंतर्गत लखमापूर (ता. बागलाण) गावासाठी मंजूर झालेली पाणीपुरवठा योजना गेल्या चार वर्षांपासून रखडल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठीची प्रतीक्षा कायम आहे. योजनेचे काम पूर्णत्वास आले असतानाही अद्याप ५० टक्के निधी अदा झाला असून, विहिरीची जागा निश्चित न झाल्याने योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.
विहीर व पंपगृहासाठी जागा निश्चित करण्याच्या मुद्द्यावरून योजनेचे काम पुढे सरकलेले नाही. ग्रामसभेत ग्रामस्थांनी वारंवार हा प्रश्न उपस्थित करूनही ठोस निर्णय होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. योजना मंजूर होऊन अनेक वर्षे उलटूनही प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू न झाल्याने जलजीवन मिशनच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
गावातील काही भागात सध्या पाणीपुरवठ्याचा दाब कमी असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे अस्तित्वातील पाणीपुरवठा व्यवस्थेवरही ताण येत आहे. दरम्यान, एका वस्तीत पाइपलाइनचे काम करण्यात आले असून, उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत आणि संबंधित यंत्रणेने तातडीने पुढाकार घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
विहिरीसाठी जागा निश्चित करण्यासाठी ग्रामसभेचा ठराव घेऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. योजनेचे काम तातडीने पूर्ण करून गावातील प्रत्येक कुटुंबाला नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.