--
महती दीपोत्सवाची : लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी
सुख-समृद्धी, मांगल्याचा सोहळा
आश्विन कृष्ण अमावास्येला लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. दीपावलीतील हा अत्यंत महत्त्वाचा दिवस असून सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची देवता लक्ष्मीचे पूजन करण्याची परंपरा आहे. या दिवशी सकाळी अभ्यंगस्नान करून घराची स्वच्छता केली जाते. सायंकाळी चौरंगावर तांदळाचे अष्टदल कमळ काढून त्यावर कलशाची स्थापना केली जाते.
कलशात गंध, अक्षता, सुपारी आणि नाणी ठेवून त्यावर लक्ष्मीची प्रतिमा विराजमान केली जाते. कुटुंबातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लक्ष्मीस्वरूप मानून त्यांचे पूजन केले जाते. लक्ष्मीला पिवळी फुले, झेंडू, शेवंती, धने, गूळ, बतासे आणि मिठाईचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी गणपती, इंद्र आणि कुबेर यांचेही पूजन केले जाते. घर स्वच्छ करणाऱ्या केरसुणीचे पूजन करण्याचीही विशेष परंपरा आहे. व्यापारी वर्गात जुनी हिशेबाची खाती बंद करून नवीन खातेवह्यांचे पूजन केले जाते. तिजोरी, तराजू आणि लेखन साहित्यालाही वंदन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या रात्रीला ‘सुखरात्री’ म्हणतात. घराघरांत दीपप्रज्वलन आणि रोषणाई करून आनंदोत्सव साजरा केला जातो. प्रकाश, स्वच्छता, कष्ट आणि समृद्धी यांचा सुंदर संगम म्हणजे लक्ष्मीपूजन.
--
अभ्यंगस्नानातून आरोग्याचा संदेश
आश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी केली जाते. दीपावलीच्या उत्सवातील हा आनंदाचा महत्त्वाचा दिवस. या दिवशी सूर्योदयापूर्वी सुवासिक उटणे लावून अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी तेलात लक्ष्मी आणि जलात गंगेचा वास असतो. स्नानानंतर यमाला तीळमिश्रित पाण्याने तर्पण करून दीपदान केले जाते. नरक चतुर्दशीशी नरकासूर वधाची पौराणिक कथा जोडलेली आहे. प्राग्ज्योतिषपूरचा राजा नरकासुर याने सोळा हजार स्त्रियांना बंदिवासात ठेवले होते. भगवान श्रीकृष्णाने सत्यभामेच्या सहकार्याने त्याचा वध करून या स्त्रियांची मुक्तता केली. या विजयाचे प्रतीक म्हणून नरक चतुर्दशी साजरी केली जाते.
या दिवशी हनुमान पूजन, सुंदरकांड पठण आणि दीपप्रज्वलन करण्याचीही परंपरा आहे. अंधारावर प्रकाशाचा, वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय हा या सणाचा संदेश आहे.
- लक्ष्मीकांत जोशी