बालिकेचे संग्रहित स्केच किंवा फोटो घेणे
--------
लक्ष्मीपूजनाला नऊ मातांच्या अंगणी ‘कन्यारत्न’
जिल्हा रुग्णालयात आनंदोत्सव; कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ९ : दिवाळी म्हणजे सुख, समृद्धी आणि मांगल्याचा सण. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रत्येक घरात धनलक्ष्मीचे पूजन करून सुख-समृद्धीची प्रार्थना केली जाते. यंदा मात्र लक्ष्मीपूजनाचा दिवस ९ कुटुंबांसाठी विशेष आनंदाचा ठरला. कारण याच शुभदिनी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ९ मातांनी कन्यारत्नाला जन्म दिला. त्यामुळे या आठही कुटुंबांच्या घरी जणू प्रत्यक्ष लक्ष्मीचे आगमन झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराघरांत दिव्यांची आरास, रांगोळ्या आणि पूजेची तयारी सुरू असताना या ९ कुटुंबांमध्ये मात्र नव्या पाहुणीच्या आगमनाचा आनंद साजरा होत होता. मुलीच्या जन्माने घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. काही कुटुंबांसाठी हा दिवाळीचा आनंद द्विगुणित करणारा क्षण ठरला, तर काहींसाठी आयुष्यातील अविस्मरणीय भेट ठरली.
भारतीय संस्कृतीत कन्येला लक्ष्मीचे रूप मानले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच कन्यारत्नाचा जन्म होणे हा केवळ योगायोग असला, तरी या कुटुंबांसाठी त्याला विशेष भावनिक महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवशी घरात आलेल्या या चिमुकल्या पाहुणींमुळे नउही घरांमध्ये आनंदाचे दिवे अधिकच उजळले आहेत.
आज मुली प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. शिक्षण, विज्ञान, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध क्षेत्रांत मुली यशाची शिखरे गाठत आहेत. त्यामुळे मुलीच्या जन्माकडे ओझे म्हणून नव्हे, तर कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात म्हणून पाहण्याची गरज आहे.
चौकट
चिमुकलींचे जल्लोषात स्वागत
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ९ घरांत जन्मलेल्या या नऊ कन्यारत्नांनी दिवाळीचा आनंद खऱ्या अर्थाने द्विगुणित केला. धनलक्ष्मीच्या पूजेच्या दिवशी घराघरांत आलेल्या या चिमुकल्या लक्ष्मींचे स्वागत आनंदाने होत आहे.