पान दोन मेन
34556, 34557, 34558
धुळे : बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी लागणाऱ्या आकर्षक मूर्ती पाहताना महिला. दुसऱ्या छायाचित्रात हिशोबाच्या नवीन डायऱ्या खरेदी करताना नागरिक. शेवटच्या छायाचित्रात लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या केरसुणीची खरेदी करताना महिला. (छायाचित्रे : गोरख गर्दे )
--
केरसुणी, मूर्ती अन् चोपड्या खरेदीची लगबग
लक्ष्मीपूजनाच्या तयारीने गजबजली बाजारपेठ; पारंपारिक वस्तूंची खरेदी
--
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ५ : दिवाळी म्हणजे उत्साहाचे, आनंदाचे आणि समृद्धीचे पर्व. सर्वत्र दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहत असतानाच घरोघरी लक्ष्मीपूजनाची लगबग सुरू झाली आहे. बाजारपेठेत आकर्षक लक्ष्मी मूर्ती विक्रीसाठी दाखल झाल्या असून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. आधुनिकतेच्या या युगात हायटेक साधनांचा बोलबाला असला तरी लक्ष्मीपूजन करताना पारंपरिक केरसुणीला आजही विशेष महत्त्व दिले जाते. शिंदीच्या पानांपासून तयार होणाऱ्या या केरसुणीला लक्ष्मीचे प्रतीक मानले जात असल्याने ग्रामीण भागासह शहरांतही या पारंपरिक झाडूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
दिवाळीच्या या काळात श्रीमंतांपासून ते गरीब कुटुंबापर्यंत सर्वच स्तरातील लोक घरात नवी केरसुणी विकत घेतात. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवीन झाडू घेऊन त्याला हळद-कुंकू लावून पूजा करण्याची प्रथा ग्रामीण भागात आजही मोठ्या श्रद्धेने पाळली जाते.
--------------
डायरीचे महत्त्व कायम
लक्ष्मीपूजनाला व्यापारी आणि व्यावसायिक नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात करतात. या दिवशी जुन्या हिशोबाच्या वह्या बदलून नवीन जमा-खर्च चोपड्यांची (डायरी) पूजा केली जाते. यंदा बाजारात विविध आकारांच्या, रंगीबेरंगी कव्हर असलेल्या आणि आकर्षक बांधणीच्या डायऱ्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या असून ग्राहकांकडून त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-
आकर्षक मूर्तींना मागणी
पारंपरिक केरसुणीच्या खरेदीसोबतच बाजारात लक्ष्मीच्या आकर्षक मूर्तींना मागणी पाहायला मिळत आहे. पारंपरिक मातीची मूर्ती आणि आधुनिक शैलीतील नवीन डिझाईन्सच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. विशेषतः सजावट केलेल्या मूर्तींची सर्वाधिक मागणी असून १०० रुपये पासून ते एक हजार रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत.
-